खालील दोन परिच्छेद नीट वाचा :
(१) राजेश हा इयत्ता सहावीत शिकत आहे. राजेशने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. राजेशचा निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. राजेशचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. राजेशला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.
(२) राजेश हा इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. त्याचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. त्याला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.
पहिल्या व दुसऱ्या परिच्छेदात कोणता फरक आहे?
पहिल्या परिच्छेदात राजेश हे नाम वारंवार आले आहे; म्हणून ते कानांना खटकते.
दुसऱ्या परिच्छेदात मात्र, दुसऱ्या वाक्यापासून राजेश या नामाऐवजी अनुक्रमे त्याने, त्याच्या, त्याचा, त्याला हे शब्द आले आहेत. त्यामुळे दुसरा परिच्छेद पहिल्यापेक्षा वाचायला बरा वाटतो.
अशा प्रकारे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात; म्हणून 'त्याने, त्याचा, त्याला' ही सर्वनामे आहेत.
एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये; म्हणून त्या नामाऐवजी मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण ही सर्वनामे वापरली जातात.
उदाहरणार्थ, खालील वाक्ये नीट वाचा :
(१) मी दुपारी शाळेत जातो. तू कधी जातोस?
(२) स्वतःचे काम स्वतः करावे.
(३) आपण केव्हा आलात?
(४) आम्ही रोज देवाला नमस्कार करतो, तुम्हीसुद्धा करा.
(५) जो आवडतो सर्वाला तो आवडे देवाला.
(६) तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते; ते सर्व अभ्यास करतात.
(७) आपण गावी कधी जाणार आहात?
(८) तो कोण आहे? त्याला काय हवे आहे?
(९) हा कोण मला विचारणार?
वरील वाक्यांतील सर्व अधोरेखित शब्द 'सर्वनामे' आहेत :
सर्वनामाचे सहा प्रकार आहेत :
(१) पुरुषवाचक सर्वनाम
(२) दर्शक सर्वनाम
(३) संबंधी सर्वनाम
(४) प्रश्नार्थक सर्वनाम
(५) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
(६) आत्मवाचक सर्वनाम
(१) पुरुषवाचक सर्वनाम
(अ) आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो.
(ब) आपण दुसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.
(क) आपण तिसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.
बोलणाय्रा किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात. वरील तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनामे तीन प्रकारची आहेत :
(अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
(१) मी बागेत जातो.
(२) आम्ही सहलीला जातो.
वरील वाक्यांत बोलणारा स्वतःविषयी बोलत आहे.
बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो, त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'मी, आम्ही, आपण, स्वतः' ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
(ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :
(१) तू बागेत जातोस.
(२) तुम्ही बागेत जाता.
(३) आपण बागेत जाता.
वरील वाक्यांत बोलणारा दुसऱ्याविषयी बोलत आहे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो. त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तू, तुम्ही, आपण, स्वतः' पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
(क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
(१) तो बागेत जातो. ती बागेत जातात.
(२) ते बागेत जातात. त्या बागेत जातात.
वरील वाक्यांत बोलाणारा तिसय्राविषयी बोलत आहे.
बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो, त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तो, ती, ते, त्या' ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
(२) दर्शक सर्वनाम :
(१) हा मधू आहे; तो सदू आहे.
(२) ही वही आहे; ती पेन्सील आहे.
(३) हे पुस्तक आहे; ते दप्तर आहे.
'हा, ही, हे' या सर्वनामांनी जवळची वस्तू दाखवली आहे.
'तो, ती, ते' या सर्वनामांनी दूरची वस्तू दाखवली आहे.
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते, त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'हा, ही, हे, तो, ती, ते' ही दर्शक सर्वनामे आहेत.
(३) संबंधी सर्वनाम :
(१) जो अभ्यास करील; तो पास होईल.
(२) जी अभ्यास करील; ती पास होईल.
(३) जे अभ्यास करतील; ते पास होतील.
'जो, जी, जे' या सर्वनामांचा संबंधी 'तो, ती, ते' या दर्शक सर्वानामांशी दाखवला आहे.
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वानामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात; म्हणून 'जो, जी, जे, ज्या' ही संबंधी सर्वनामे आहेत.
(४) प्रश्नार्थक सर्वनाम :
(१) सहलीला कोण जाणार आहे?
(२) तुला काय पाहिजे?
(३) कोणाला पुस्तक हवे?
वरील वाक्यांतील 'कोण, काय, कोणाला' या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी झाला आहे.
ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या' ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा