Advertisement

मंगळवार, २७ मे, २०१४

वटसावित्री Vatsavitra

    एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला, 'की असे कोणते व्रत आहे की, त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा?
    मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी, धार्मिक होता. पण त्याला संतती नव्हती. सावित्रीदेविच्या उपासनेने त्याला एक कन्या होते. तिचे नाव वरदासावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हमून अश्वपतीराजाने तिला आवडेल असा सर्वगुणसंपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र - सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर, गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील. हे देवर्षी नारदानी अश्वपतीला भाकित सांगितले होते. म्हणून अश्वपतिराजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे, हे जाणून त्रिरात्र व्रत केले. चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली.
    त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अति श्रमाने ग्लानी आली. म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, प्रतिव्रतेच्या भावना याचे विव्द्त्तापुर्वक विवेचन केले. तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्रनाशिवाय काहीही मागायला सांगितले, तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तू म्हटले, त्यामुळे दिव्याशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टिलाभ झाला. तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की, हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की, पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्रनाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते की, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र. स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चवथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जावू लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की, मला स्वर्गसुख नको. पतिशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही.
    तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतीकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवणदान दिले.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा