Advertisement

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

दूरदर्शनने आम्हांला काय दिले?

'दूरदर्शनने आम्हांला काय दिले?' खरोखरच या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण भारतात दूरदर्शन येऊन आता पंचवीस वर्षे होऊन गेली. २ ऑक्टोबर, १९७२ रोजी मुंबईत टी.व्ही. सुरू झाला. त्यापूर्वी दिल्लीत टी.व्ही. होता; पण तो इतक्या लोकांपर्यंत पोचला नव्हता. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांनी दूरदर्शनचा प्रसार खेडोपाडी व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. 'लोकांना भाकरी हवी आहे, टी.व्ही. नको,' अशी परखड टीकाही झाली. पण या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की "भाकरीही देऊ; पण विचारांची भूक भागवण्यासाठी दूरचित्रवाणी हवीच."
आता ही दूरचित्रवाणी दूरवर पोचली आहे. आता शहराप्रमाणे गावागावांतून, बंग्ल्यांतून, उंच इमारतींतून त्याचप्रमाणे सर्वत्र झोपडपट्टीतून, गोरगरिबांच्या वस्त्यांतूनही दूरदर्शन ही नित्याची गोष्ट झाली आहे. आपण दूरदर्शनवरच्या विविध वाहिन्या पाहतो, तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. केवळ मराठी भाषेत कार्यक्रम सादर करणाऱ्या सहा वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे आज अनेक कलावंत, तंत्रज्ञ यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खरे कार्यक्षेत्र मिळाले आहे. नवे कलावंत पुढे येत आहेत. जुन्या चांगल्या साहित्याची ओळख अगदी सर्वसामान्य प्रेक्षकापर्यंत पोचत आहे. ही दूरदर्शनने दिलेली भेट नाही का?
मनोरंजन आणि प्रबोधन हे दूरदर्शन-निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हाच दूरदर्शनचा मनोरंजनाचा गुण आता टीकेला कारण होत आहे. दूरदर्शन संचापुढे माणसे-मुले चिकटून बसतात. त्यामुळे वाचनाची सवय राहत नाही. मुले मोकळ्या हवेत खेळत नाहीत, हा आरोप दूरदर्शनवर केला जातो. विद्वान मंडळी दूरदर्शनला 'इडियट बॉक्स' म्हणतात. त्यांच्या मते दूरदर्शन पाहणारी माणसे विचार करत नाहीत. काही अंशी हे आरोप खरेही असतील. पण त्याचबरोबर या विचारवंतांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, पुस्तके वाचून त्यावर चिंतन करणारा समाज आपल्याकडे किती आहे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांनी आपले वाचन आजही सोडले नाही.
उरलेला जो न वाचणारा किंवा ज्याला वाचताच येत नाही, असा केवढा तरी मोठा समाजाचा भाग आहे. त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे काम 'दूरचित्रवाणी' नक्कीच करते. दुरचित्रवाणीमुळे आपला तळागाळातला समाज बऱ्याच नवीन गोष्टी जाणू लागला आहे. एशियाड, ऑलिम्पिक अशा स्पर्धा आज वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. पण दुरचित्रवाणीमुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉलबरोबर कबड्डी, खोखोचे सामनेही बारकाईने पाहिले जातात. प्राणिजगताविषयी भौगोलिक माहिती देणारी वाहिनी (नॅशनल जिआग्राफी) अतिशय अपूर्व माहिती प्रेक्षकाला देते. बातम्या या दृक् झाल्यामुळे ती ती स्थळे समोर येतात. सारे जग जवळ येते. शेतकरी, कामगार यांचे प्रश्न दुरचित्रवाणीवर मांडले जातात. आपल्या घरात एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना दूरचित्रवाणी हे एक वरदानच ठरले आहे.
दूरदर्शन भरभरून देत आहे. त्यांतून आपण किती व काय घ्यायचे, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा