Advertisement

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

रवींद्रनाथ टागोर

जीवनपरिचय - प्रतिभाशाली साहित्यामुळे जागतिक पातळीवरील नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले, त्या रवींद्रनाथ टागोरांचे नाव भारतातल्या प्रत्येक घराघरात माहीत आहे. त्यांचा 'गीतांजली' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यात जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षणपद्धतीचे प्रवर्तक  म्हणून रवींद्रनाथ टागोरांचे नाव घ्यावे लागते. रवींद्रनाथांचे सर्व वाड्मय हे ४० खंडांमध्ये प्रसिध्द झालेले आहे. रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते.
रवींद्रनाथांच्या मातेचे नाव शारदादेवी आणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ. त्यांना आठ भाऊ व सहा बहिणी होत्या. रवींद्रनाथांचा जन्म ७ मे १८६१ रोजी अत्यंत समृध्द घराण्यात झाला. घरी संपन्नता असूनही रवींद्रनाथ अगदी साधेपणाने राहत. त्याकाळात घरी मुलांना शिकवावे ही पद्धत फार रूढ होती. शाळा संपल्यावर ते घरी आले की, व्यायाम शिकवणारे शिक्षक येत. नंतर चित्रकलेसाठीही त्यांच्या वडिलांनी शिक्षक नेमले होते. मग इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षक येत. ते सात - आठ वर्षांचे असतानाच कविता करीत. काव्याबरोबर ते संगीतही शिकले. त्यांना बॅरिस्टर पदवी प्राप्त व्हावी म्हणून वडिलांनी इंग्लंडला पाठविले. पण कायद्याचे शिक्षण त्यांना आवडत नसे. शेवटी ते इंग्लंडहून परत आले. इंग्लंडमध्ये असताना त्यांना लोकगीते फार आवडली. त्या लोकगीतांच्या चाली त्यांनी आत्मसात केल्या. या चालीवर त्यांनी 'वाल्मिकी-प्रतिभा' या आपल्या संगीतीकेमधील गीते लिहिली. १८८३ साली त्यांचा विवाह झाला. मृणालिनी हे त्यांच्या पत्नीचे नाव. त्यांना तीन कन्या व दोन मुले झाली. रवींद्रनाथांनी कलकत्त्यापासून जवळच असणाऱ्या शांतिनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्रीनिकेतन ही संस्था काढली.
कुटिरोद्योगाची कल्पना, शेतकऱ्यांसाठी कृशिबँक, हितैषीसभा त्यांनी सुरू केल्या. नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात शिक्षण द्यावे, यावर रवींद्रनाथांचा भर होता. वृक्षाच्या सावलीत, तपोवनाच्या कल्पनेवर आधारीत त्यांनी शिक्षणाची नवी पद्धती सुरू केली. तेथे शिष्यांच्या चित्ताला पल्लवित करणारे गुरू त्यांना निर्माण करायचे होते. तेथील आश्रमात त्यांनी भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन केले. त्याचप्रमाणे शेती-शिक्षण आणि ग्रामसुधारणा यांचेही शिक्षण तेथे दिले जाई. शांतिनिकेतन विद्यालयातूनच पुढे विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. तेथे जगभरातून आलेले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. टागोरांनी लेखन, चित्रकला, संगीत, शिक्षण, धर्म इ. क्षेत्रांत नावीन्य निर्माण केले. टागोरांना ध्यानात रंगणे आवडे, तसेच काव्यामध्ये गूढगुंजन करण्याचीही त्यांची सवय होती. पण असे असूनही भारतमातेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. वंगभंगचळवळीत त्यांनी तेथे सभेसाठी जमलेल्या निष्पाप भारतीयांवर गोळीबार झाला. हे रवींद्रनाथांना आवडले नाही म्हणून ब्रिटिशांनी त्यांना दिलेली 'सर' ही पदवी ब्रिटिश सरकारकडे परत पाठवली.
रवींद्रनाथांचे 'जन गण मन' हे राष्ट्रगीत झाले तर 'आमार सोनार बांगला' हे बांगला देशाचे राष्ट्रगीत झाले. रवींद्रनाथ टागोर हे सौंदर्यवादी कवी व तत्त्वज्ञ होते. ते सत्य व शिव यांचा साक्षात्कार सौंदर्याव्दारा घडवीत.
शेवटी एका प्रार्थनेत ते म्हणतात, ''ईश्वराकडे माणसाने वैभव, समृद्धी, श्रीमंती व उन्नती, स्वतः आळशी राहून न मागता जीवन सर्व दृष्टींनी फुलवण्यासाठी ईश्वराने आपणास म्हणजे माणसास बळ, निर्भयता, सहनशीलता, आत्मविश्वास, श्रद्धानिष्ठा व स्वतःचे आंतरिक सामर्थ्य सतत मिळू दे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा