दूर्वां
श्री गजाननाच्या पूजेमध्ये रोज २१ किंवा २१ च्या पटीत दूर्वा पवित्र मानल्या आहेत. ऋग्वेद व नंतरच्या ग्रंथांत दूर्वांचा उल्लेख आला आहे. मराठीत हरळी, हिंदीत दूब, गुजरातीत दरो, कन्नडमध्ये गिरके हळळू, तर संस्कृत भाषेत शतग्रंथा असे म्हटले जाते. वैज्ञानिक भाषेत 'सायनोडॉन डॅक्टिलॉन' असे म्हटले जाते. ही वनस्पती जननक्षम असून संघ करून वाढणारी आहे. हे एक परिचित, उपयुक्त, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत बहुतेक उष्ण देशांत सर्वत्र आढळते. हिमालयात २,४०० मी. उंचीपर्यंत व अनुकूल परिस्थितीत इतरत्र शेतात व बागेत तानासारखे वाढते. संस्कृत भाषेत याला सुमारे चाळीस नावे आहेत, वैदिक वाड्मयात शाण्डदूर्वा व पाकदूर्वा असे दोन प्रकार सांगितले आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात ताग, रुई, अळशी यांच्याबरोबर तिचा अंतर्भाव तृनावार्गात केला आहे. हिचे खोड जमिनीवर किंवा थोडे पृष्ठभागाखाली आडवे वाढून खूप लवकर पसरते, पेर्यांपासून लहान उभ्या फांद्या व त्यावर हिरवीगार, रेषाकृती, साधी, बारीक, गवतासारखी पणे येतात तसेच फांद्यांच्या टोकास पुढे २ - ६ कणिसांचा चवरीसारखा फुलोरा येतो. त्यावर बिनदेठाचे कणिस येते. त्या प्रत्येकात तुसांनी वेढलेले एक व्दिलिंगी फूल असते. साधारणपणे पावसाळ्यानंतर फुले येतात. फुलात तीन केसरदले किंजल्क येतो. तर फळ शुष्क, एकबीजी व न तडकरणारे असते. इतर शारीरिक लक्षणे तृण कुंलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड तुकडे लावून किंवा बिया फोकून करता येते. जमिनीची धूप थांबवण्यास व खेळाच्या मैदानांवर याची लागवड करतात. बंगल्याच्या आवारात, सार्वजनिक बागेत याचीच हिरवळ करतात. गुरांना, सशांना, सशांना व मेंढ्यांना याचा चारा आवडतो. हे गवत स्तंभक म्हणजे आकुंचन करणारे. लघवी साफ करणारे असून जखमेवर पानांचा रस लावतात. याच्या मुळचा थंड पाण्यात भिजवून काढलेला रस रक्ती मुळव्याधीवर देतात. मुळांचा काढा मुत्रल असून उपदंशात देतात. वेदनादायी सूज, अतिसार, अपस्मार, आमांश इत्यादींवरही दूर्वांचा रस उपयुक्त असतो. उचकी थाबवण्यास दूर्वांच्या ताज्या मुळ्यांचा रस आणि मध एकेक चमचा एकत्र करून चटण्यास देतात, तर अशी ही बहुगुणी दूर्वा फक्त पुजेसाठीच नाही, आरोग्यासाठी देखाल अत्यंत फलदायी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा