Advertisement

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

चला चला रे शाळेत

चला चला रे शाळेत आपुल्या सुंदर दुनियेत।।धृ।।
आहे शाळा आपली छान
स्वच्छ ठेवण्या राखू भान
भिंती चित्रांनी सजवू
सभोवती झाडे लावू
नीटनेटके राहून सारे आपण मिरवू ऐटीत।।१।।
परिपाठाचा महिमा थोर
आदर्शांना ठेवू समोर
गुरुजनांचा ठेवू मान
मुलगी मुलगा एक समान
खेळ खेळता फेर धरू या रंगून जाऊ गाण्यात।।२।।
अमोल धन हे ज्ञानाचे
लक्षण असे हे प्रगतीचे
सृष्टीच्या पुस्तकात जाऊ
पुस्तकातली सृष्टी पाहू
आनंदाचा ठेवा सारा दडला पानापानांत।।३।।
मोठे होऊन कसे जगावे
अभ्यासातून हेच शिकावे
शिकता शिकता ज्ञान आपुले
कृती कराया सिद्ध असावे
तनात शक्ती मना युक्ती प्राप्त करू या जोषात।।४।।
मानवतेचा धर्म महान
समभावाचे गौरवगान
विज्ञानाचा मंत्र स्मरू
सारे मिळून कष्ट करू
वैभवशाली या देशाला नेऊ पुढे अभिमानात।।५।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा