Advertisement

बुधवार, २८ मे, २०१४

महाराणा प्रताप Maharana Pratap

        मेवाड नरेश महाराणा प्रताप याचे नाव भारतीय इतिहासात देशभक्ती, साहस, संघर्ष, ठाम संकल्प आणि मातृभूमीसाठी अमर बलिदान याला पर्याय आहे. त्यांच्या वंशात अनेक थोर योद्धे झाले. जसे राणा सांगा, बप्पा रावल, राणा हमिरा. महाराणा ही पदवी मात्र फक्त प्रताप यांनाच मिळाली. ९ मे १५४९ रोजी त्यांची सुंदर राणी जयंवत बाई हिने कुभंलगढ किल्ल्यात एका पुत्राला जन्म दिला. राजा उदय सिंग याने आपल्या पुत्राचे नाव 'राणा प्रताप' ठेवले. महाराणा प्रताप एक वीर बालक होते. ते लहानपणापासूनच स्वातंत्र्य, शौर्य आणि स्वाभिमान याला महत्त्व देत होते. लहानपणी महाराणा प्रतापला खेळ आणि घोडेस्वारी याची खूप आवड होती. त्यांनी विविध शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहानपणीच घेतले होते. जायंवंती बाई राजा उदयसिंगाची सर्वात पहिली पत्नी होती. सर्वात लहान असलेली राणी धीरबाई महाराजांची सर्वात लाडकी राणी होती.
        महाराणा प्रताप याचे शौर्य आणि कौशल्य याने राजाचे मन जिंकले होते. हे पाहून राणी धीरबाईला चांगले वाटत नसे. आपला मुलगा जगमाल याला राज्याचा वारस म्हणून नेमावे, अशी तिची इच्छा होती. ती राजाला म्हणाली, "महाराज, माझा मुलगा जगमाल याचा राज्याचा वारस म्हणून नेमावे, अशी माझी इच्छा आहे.  १५६७ साली मेवाडची राजधानी चितौडवर आक्रमण करण्याची सम्राट अकबराने योजना आखली. मोगल सेना संख्येने खूप मोठी आणि भंयकर होती. अर्थात राजपूतही काही कमी नव्हते. विशाल मोगल सैन्याशी ते शौर्याने लढले. शेवटी चितौडला वेढा घालण्यात मोगल सैन्याला यश आले.
        राजा उदय सिंग खूप स्वाभिमानी होता. त्याला आपला देश आणि जनता खूप प्रिय होती. त्याने अकबरासमोर शरणागती पत्करायला नकार दिला. आपल्या कुटुंबासह गोगुंडाला गेल्यावरही राजा उदयसिंगाच्या मनाला शांतता मिळाली नाही. सम्राट अकबराने आपल्या मातृभूमिवर केलेल्या अत्याचाराचा त्यांना बदला घ्यायचा होता. अनेक वर्षे राजा आपली राजधानी आणि जनता यांच्यासाठी युद्ध करीत राहिला. १५७२ मध्ये राजा उदय सिंग यांचे गोगुंदा येथे निधन झाले. एक चांगल्या राजासाठी आवश्यक असणारे सर्व गुण प्रतापमध्ये असल्याचे जनतेला माहीत होते. राजकुमार जगमाल याच्यात ही सर्व वैशिष्ट्ये नव्हती. महाराणा प्रताप यांना आपली मातृभूमी चितौड विषयी खूप प्रेम होते. मोगलच्या ताब्यातून त्याला तिची सुटका करायची होती. जन्मभर मोगलांशी संगर्ष करीत राहण्याची महाराणा प्रतापने शपथ घेतली. त्यांनी आपली राजधानी कुंभलगड येथे हलविली. त्यांनी मेवाडमधील जनतेच्या मनात मेवाडविषयी प्रेम निर्माण केले.
        लोक कोणत्याही प्रकारे महाराणा प्रतापला मदत करण्यासाठी तयार होते. सर्व प्रकारच्या सुख सुविधांचा त्याग करून अनेक लोक बिलदानासाठी सज्ज झाले. १५७२ मध्ये अकबराने महाराणा प्रतापला मैत्रिचा संदेश पाठविला. त्याने आपले काही कुटनीतीज्ञ महाराणा प्रतापला हे समजावून सांगण्यासाठी पाठविले, की महाराणा प्रतापाने या करारावर स्वाक्षरी करावी. पण महाराणा आपल्या निर्णयापासून ढळले नाही.
        सम्राट अकबर कोणत्याही प्रकारे महाराणा प्रतापशी तह करू शकला नाही तेव्हा त्यानेही युद्ध करण्याचा पर्याय निवडला. १५७६ च्या अखेरीस अकबराने मेवाडविरूद्ध युद्ध सुरू केले. हे युद्ध इतके सोपे असणार नाही, हे महाराणाला माहीत होते. त्यानेही एक योजना आखली. त्याने सर्व दरबारी आणि सैनिकांना सैनिकांना अरवली पर्वत रांगात जाण्याचा आदेश दिला. हल्दीघाटावर युद्ध करण्याची महाराणा प्रतापची इच्छा नव्हती; पण त्यांचे दरबारी म्हणाले, "महाराणा, अकबराच्या सैन्याला मैदानात युध्द करणे माहीत आहे. या घाटीत ते आपले कौशल्य दाखवू शकणार नाहीत. आपण त्यांना इथेच पराभूत करू शकतो." प्रतापला ही योजना आवडली. खूप दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर दोन्ही सैन्य २१ जून १५७६ रोजी  हल्दिघाटीच्या मैदानात समोर समोर आले. हल्दिघाटातील युद्धाच्या वेळी महाराणा प्रताप चेतक नावाच्या उंच आणि शक्तिमान घोड्यावर स्वार झाले होते. या युद्धात चेतक गंभीररित्या जखमी झाला होता. तरीही त्याने हिमत सोडली नव्हती. तो दोन मैल आपल्या मालकाला घेऊन सुखरूप गेला. लवकरच ते बलिया नावाच्या गावात पोहचेले.
        शूर असलेल्या चेतकने एका उडीत नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पायाला झालेली जखम गंभीर होती. नाली पार केल्या बरोबर त्याचे प्राण गेले. त्याचा मृत्यू झाल्याचे पाहून महाराणा खूप दुःखी झाले. कोणत्याही किमतीवर अकबरापासून आपले राज्य परत मिळविणे आणि आपल्या प्रजेला मुक्ती मिळवून देणे यासाठी प्रताप यांनी ठाम निश्चय केला होता. मजहेडा येथे गेल्यावर महाराणाची भिल्लांसी भेट झाली. महाराणाने वेळ वाया घालविला नाही. त्यांनी भिल्ल  सैन्याच्या मदतीने अतिशय वेगाने गोगुंदावर हल्ला केला. त्यांनी २३ जून १९७६ ला भिल्ल सैन्याच्या मदतीने गोगुंदावर ताबा मिळविला. महाराणाने आपल्या शौर्याच्या बळावर गोगुंदा आणि उदयपूर पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. लवकरच त्यांनी आपली राजधानी आपले जन्म ठिकाण असलेल्या कंभलगडच्या डोंगरात घेऊन गेले.
        महारानाचे सर्व लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित झाले होते. आपल्या जवळ आर्थिक पाठबळ नाही तरीही त्यांनी धीर सोडली नाही. महाराणासारख्या खऱ्या देशभक्ताजवळ आपल्या शत्रूशी लढण्यासाठी पुरेसे मानसिक बळ आणि धाडस होते. धनाचा अभाव ही मोठी समस्या होती. किती तरी महिने त्याचे कुटुंब जंगलात झाडाची पाने आणि बोरे खाऊन उदर निर्वाह करीत होते. महाराणा प्रताप जमिनीवर झोपत असे आणि पातेल्यात जेवण जेवत असे. त्या थोर राजाने आपल्या प्रजेच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग केला होता. हा त्यांचा जीवनातील भयानक संकटाचा काळ होता. भामाशाह हे  प्रताप यांच्या मंत्र्यांपैकी एक होते. भामाशाहणे प्रताप याला पंचवीस हजार अशर्फिया आणि दोन लाख पन्नास हार रुपये देऊन मदत केली. त्याने भामाशाहकडून धन घेतले. एक विशाल सेना निर्माण केली. त्याने मोगलाविरुध्द एक अतिशय शक्तिशाली सेना तयार केली. मग त्याने दीवर, हमीरसरा, जावर, बागड आणि चावंदवर ताबा मिळविला. १५५८ पर्यंत महाराणाने जवळपास सर्व मेवाडवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. मेवाडवाशी अतिशय आनंदी होते. आता त्यांना काही भीती नव्हती. सत्ता महाराणाच्या हातात होती. आता आपण मोगलांपासून सुरक्षित असल्याची त्यांच्यात भावना निर्माण झाली होती. वृद्धावस्थेतही महाराणाला शौर्य आणि देशभक्तीची भावना प्रभावित करू शकली नाही. ते सक्रियपणे आपले राज्य कारभार करीत होते. प्रजेचे कल्याण सदैव लक्षात ठेवले होते. १९ जानेवारी १५९७ ला महाराणा प्रताप यांचे निधन झाले. 'मुलाला म्हणत, तू नेहमी मोगलांपासून मेवाडचे रक्षण करशील असे मला वचन दे'.

मंगळवार, २७ मे, २०१४

वटसावित्री Vatsavitra

    एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला, 'की असे कोणते व्रत आहे की, त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा?
    मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी, धार्मिक होता. पण त्याला संतती नव्हती. सावित्रीदेविच्या उपासनेने त्याला एक कन्या होते. तिचे नाव वरदासावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हमून अश्वपतीराजाने तिला आवडेल असा सर्वगुणसंपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र - सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर, गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील. हे देवर्षी नारदानी अश्वपतीला भाकित सांगितले होते. म्हणून अश्वपतिराजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे, हे जाणून त्रिरात्र व्रत केले. चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली.
    त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अति श्रमाने ग्लानी आली. म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, प्रतिव्रतेच्या भावना याचे विव्द्त्तापुर्वक विवेचन केले. तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्रनाशिवाय काहीही मागायला सांगितले, तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तू म्हटले, त्यामुळे दिव्याशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टिलाभ झाला. तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की, हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की, पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्रनाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते की, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र. स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चवथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जावू लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणांविषयी, त्याच्या परोपकारांविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की, मला स्वर्गसुख नको. पतिशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही.
    तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतीकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्यशक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवणदान दिले.      

सोमवार, १९ मे, २०१४

Visheshan विशेषण

व्याकरण  - विशेषण

खालील वाक्यांच्या अधोरेखित शब्दा कडे नीट लक्षात द्या
१) कविता गोड मुलगी आहे
२) कविता चौथ्या इयत्तेत शिकते
३) समिधा तिच्या पुस्तके-वह्या नीटनेटक्या ठेवते

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे त्यांच्यानंतर आलेल्या नामांविषयी विशेष माहिती सांगतात.
उदाहरणार्थ :
१) मुलगी कशी? - गोड ('मुलगी' या नामाबद्दल विशेष माहिती.)
२) इयत्ता कुठली? - चौथी ('इयत्ता' या नामाबद्दल विशेष माहिती.)
३) पुस्तके-वह्या कुणाच्या? ('पुस्तक-वह्या' या नामाबद्दल माहिती.)

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात; 'विशेष्य' म्हणतात.
विशेषण  -  विशेष्य
गोड  -  मुलगी
चौथा  -  इयत्ता
तिच्या  -  पुस्तके-वह्या

विशेषणाचे मुख्य सहा प्रकार आहे
१) गुणविशेषण   २) संख्याविशेषण    ३) सार्वनामिक विशेषण  
४) नामसाधित विशेषण    ५) धातुसाधित विशेषण    ६) अव्ययसाधित विशेषण 


१) गुणविशेषण

खालील वाक्यांच्या अधोरेखित शब्दा कडे नीट लक्षात द्या
१) अहमदनगरला मोठे धरण आहे.
२) मला मंजूळ आवाज आवडतो.
३) राधाचा हसरा चेहरा आहे.

पहिले वाक्य : धरण कशे? - मोठे
(या वाक्यात 'मोठे' या शब्दाने धरणाचा गुण सांगितला आहे.)

दुसरे वाक्य : आवाज कसा? - मंजूळ
(या वाक्यात 'मंजूळ' या शब्दाने आवाजाचा गुण सांगितला आहे.)

तिसरे वाक्य : चेहरा कसा? - हसरा
(या वाक्यात 'हसरा' या शब्दाने चेहराचा गुण सांगितला आहे.)

ज्या विशेषणाने नामाचा गुण दाखवला जातो, त्यास गुणविशेषण म्हणतात; म्हणून मोठे, मंजूळ, हसरा ही गुणविशेषणे आहेत.

काही गुणविशेषणे :
गुणविशेषण - विशेष्य
काळीभोर  -  जमीन
पांढरा  -  बगळा
शूर  -  योद्धा
लाल  -  गुलाब
आंबट  -  बोरे
भित्रा  -  ससा

२) संख्याविशेषण

खालील वाक्यांच्या अधोरेखित शब्दा कडे नीट लक्षात द्या
१) पहिल्या रांगेत दहा मुले आहेत.
२) इथून दुसरा वर्ग सहाव्या इयत्तेचा आहे.
३) जत्रेला पुष्कळ माणसे आली.

पहिले वाक्य :
कितवी रांग? - पहिली
किती मुले? - दहा
(या वाक्यात 'रांग' ऑ 'मुले' या नामांची संख्या दाखवली आहे.)

दुसरे वाक्य :
कितवा वर्ग? - दुसरा
कितवी इयत्ता? - सहावी
(या वाक्यात 'वर्ग' व 'इयत्ता' या नामाची संख्या दाखवली आहे.)

तिसरे वाक्य : किती माणसे? - पुष्कळ
(या वाक्यात 'माणसे' या नामाची संख्या दाखवली आहे.)

ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते, त्यास संख्याविशेषण म्हणतात; म्हणून 'पहिल्या, दहा, दुसरा, सहाव्या, पुष्कळ' ही संख्याविशेषणे आहेत.

काही संख्याविशेषणे :
संख्याविशेषण - विशेष्य
शंभर  -  रुपये
वीस  -  पाने
अर्धा  -  तास
दुप्पट  -  पैसे
काही  -  लोक
दहावा  -  नंबर

३) सार्वनामिक विशेषण

१) झाडावरचा तो पक्षी गात होता.
२) माझी शाळा मला आवडते.
३) त्याचे कपडे तो धुतो.
वरील वाक्यांतील 'तो', 'माझी', 'त्याचे' ही मुळात सर्वनामे आहेत; पण ही सर्वनामे वाक्यांत नामांविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणजे येथे ती विशेषणांचे कार्य करतात. जसे -
१) कोणता पक्षी? - तो
२) कोणाची शाळा? - माझी
३) कोणाचे कपडे? - त्याचे
सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात; म्हणून 'तो, माझी, त्याचे' ही सार्वनामिक विशेषणे आहेत.

काही सार्वनामिक विशेषणे :
सार्वनामिक विशेषण  -  विशेष्य
कोणते  -  खेडे
असले  -  पुस्तक
कोणता  -  पक्षी
हा  -  मनुष्य
माझे  -  बाबा
ते  -  दृश्य    

चरणारी व सुरती हे शब्द गायीबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ती विशेषणे आहेत.
'चर' या धातूपासून (क्रियापद - चरणे) 'चरणारी' विशेषण तयार झाले म्हणून त्याला धातुसाधित विशेषण म्हणावे
तर सुरत या नामापासून सुरती हे गायीचे विशेषण झाले तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात.

४) नामसाधित विशेषण   
उदाहरणे - कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री, संरक्षणमंत्री, पंढरीचा महिमा

५) धातुसाधित विशेषण   
उदाहरणे - वाहणारी नदी, उडती पाखरे, हसरे मूल

६) अव्ययसाधित विशेषण 
सर्वनामांपासून होणारी विशेषणे - सार्वनामिक वा सर्वनामसाधित विशेषणे, नामांपासून बनतात ती नामसाधित विशेषणे, धातूंपासून होतात ती धातूसाधित विशेषणे; त्याच प्रमाणे अव्ययांपासून बनतात त्यांना अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.





सोमवार, ५ मे, २०१४

Sarvnam सर्वनाम व्याकरण

सर्वनाम


खालील दोन परिच्छेद नीट वाचा :
(१) राजेश हा इयत्ता सहावीत शिकत आहे. राजेशने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. राजेशचा निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. राजेशचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. राजेशला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.              

              
(२) राजेश हा इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. त्याचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. त्याला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली.

   पहिल्या व दुसऱ्या  परिच्छेदात कोणता फरक आहे?
   पहिल्या परिच्छेदात राजेश हे नाम वारंवार आले आहे; म्हणून ते कानांना खटकते.
   दुसऱ्या परिच्छेदात मात्र,  दुसऱ्या वाक्यापासून राजेश या नामाऐवजी अनुक्रमे त्याने, त्याच्या, त्याचा, त्याला हे शब्द आले आहेत. त्यामुळे दुसरा परिच्छेद पहिल्यापेक्षा वाचायला बरा वाटतो.
  
अशा प्रकारे नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात; म्हणून 'त्याने, त्याचा, त्याला' ही सर्वनामे आहेत.
एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये; म्हणून त्या नामाऐवजी मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण ही सर्वनामे वापरली जातात.

उदाहरणार्थ, खालील वाक्ये नीट वाचा :
(१) मी दुपारी शाळेत जातो. तू कधी जातोस?
(२) स्वतःचे काम स्वतः करावे.
(३) आपण केव्हा आलात?
(४) आम्ही रोज देवाला नमस्कार करतो, तुम्हीसुद्धा करा.
(५) जो आवडतो सर्वाला तो आवडे देवाला.
(६) तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते; ते सर्व अभ्यास करतात.
(७) आपण गावी कधी जाणार आहात?
(८) तो कोण आहे? त्याला काय हवे आहे?
(९) हा कोण मला विचारणार?

वरील वाक्यांतील सर्व अधोरेखित शब्द 'सर्वनामे' आहेत :
सर्वनामाचे सहा प्रकार आहेत :
(१) पुरुषवाचक सर्वनाम                
(२) दर्शक सर्वनाम
(३) संबंधी सर्वनाम                   
(४) प्रश्नार्थक सर्वनाम
(५) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
(६) आत्मवाचक सर्वनाम 
          
(१)  पुरुषवाचक सर्वनाम
(अ) आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो.
(ब) आपण दुसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.
(क) आपण तिसऱ्या विषयी बोलतो किंवा लिहितो.
    बोलणाय्रा किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात. वरील तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना  पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.
    पुरुषवाचक सर्वनामे तीन प्रकारची आहेत :
     (अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
     (१) मी बागेत जातो.
     (२) आम्ही सहलीला जातो.
    वरील वाक्यांत बोलणारा स्वतःविषयी बोलत आहे.
    बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो, त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'मी, आम्ही, आपण, स्वतः' ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
    (ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :
    (१) तू बागेत जातोस.
    (२) तुम्ही बागेत जाता.
    (३) आपण बागेत जाता.                                                                                                             

   वरील वाक्यांत बोलणारा दुसऱ्याविषयी बोलत आहे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो. त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तू, तुम्ही, आपण, स्वतः' पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
   (क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
   (१) तो बागेत जातो. ती बागेत जातात.
   (२) ते बागेत जातात. त्या बागेत जातात.
  वरील वाक्यांत बोलाणारा तिसय्राविषयी बोलत आहे.
  बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो, त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'तो, ती, ते, त्या' ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
                                                                                                                                             

 (२) दर्शक सर्वनाम :                         
(१) हा मधू आहे; तो सदू आहे.
(२) ही वही आहे; ती पेन्सील आहे.
(३) हे पुस्तक आहे; ते दप्तर आहे.
'हा, ही, हे' या सर्वनामांनी जवळची वस्तू दाखवली आहे.
'तो, ती, ते' या सर्वनामांनी दूरची वस्तू दाखवली आहे.
  जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते, त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'हा, ही, हे, तो, ती, ते' ही दर्शक सर्वनामे आहेत.

(३) संबंधी सर्वनाम :
(१) जो अभ्यास करील; तो पास होईल.
(२) जी अभ्यास करील; ती पास होईल.                                                                          
(३) जे अभ्यास करतील; ते पास होतील.
'जो, जी, जे' या सर्वनामांचा संबंधी 'तो, ती, ते' या दर्शक सर्वानामांशी दाखवला आहे.
  वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वानामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात; म्हणून 'जो, जी, जे, ज्या' ही संबंधी सर्वनामे आहेत.

(४) प्रश्नार्थक सर्वनाम :
(१) सहलीला कोण जाणार आहे?
(२) तुला काय पाहिजे?
(३) कोणाला पुस्तक हवे?                                             
  वरील वाक्यांतील 'कोण, काय, कोणाला' या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी झाला आहे.
  ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात; म्हणून 'कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या' ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत.

गुरुवार, १ मे, २०१४

Nam नाम व्याकरण

*नाम*

खालील सर्व शब्दांना व्याकरणान नाम म्हणतात.
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम म्हणतात.
मुलांची नवे    :    राजेश          कुमार           यज्ञेश
मुलींची नावे   :    संगीता        शीतल           कुसुम
पक्ष्यांची नावे :     मोर            चिमणी          पोपट
प्राण्यांची नावे :    हत्ती             चिता            सिंह
फुलांची नावे  :     झेंडू             मोगरा          गुलाब
फळांची नावे  :     पपई            पेरू              आंबा
भाज्यांची नावे :   भोपळा         भेंडी            कोबी
वस्तूंची नावे :      फळा            खुर्ची           टेबल
पदार्थांची नावे :    चकली         चिवडा         लाडू
नद्यांची नावे :       गोदावरी      यमुना         गंगा
पर्वतांची नावे :     सातपुडा      सह्याद्री         हिमालय
अवयवांची नावे :  नाक           कान            डोळा
नात्यांची नावे :    आई           बहीण           भाऊ
काल्पनिक नावे :  परी            राक्षस          देवदूत
गुणांची नावे :       महानता     नम्रता          शौर्य
मनःस्थितीची नावे : उदास     दुःख            आनंद
(माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात.)

नामांचे प्रकार
१) सामान्यनाम    २) विशेषनाम     ३) भाववाचकनाम

१) सामान्यनाम :
वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :
१) ओजस्वी हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
२) 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो.
३) 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो.
    अशा प्रकारे 'मुलगी, नदी, शहर' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.
    ही नामे जातीवाचक, म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत. जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्यनाम म्हणतात; म्हणून मुलगा, नदी, शहर ही सामान्यमाने आहेत.
(एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुंणधर्मांमुळे जे नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम म्हणतात. उदा. मुलगा, नदी, शहर, घर, फूल, पुस्तक, चित्र, कपाट, टोपी इत्यादी .......)

२) विशेषनाम :
पुन्हा तीच वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या :
१) ओजस्वी हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) मुंबई प्रसिद्ध शहर आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'ओजस्वी' हा शब्द एकाच मुलीला लागू पडतो.
२) 'गंगा' हा शब्द एकाच नदीला लागू पडतो.
३) 'मुंबई' हा शब्द एकाच शहराला लागू पडतो.
    अशा प्रकारे 'ओजस्वी, गंगा, मुंबई' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात.
    ही नामे व्यक्तिवाचक आहेत. व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेषनाम म्हणतात, म्हणून ओजस्वी, गंगा, मुंबई ही विशेषनामे आहेत.
(ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला विशेषनाम म्हणतात. उदा. - संतोष, सुमित, सुनंदा, मुंबई, भारत, गंगा, नागपूर इत्यादी.......)

३) भाववाचकनाम :
वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या : 
१) ओजस्वीची हुशारी सर्वांना माहीत आहे.
२) गंगाचे पावित्र्य मनात ठसवा.
३) मुंबई शहरात संपन्नता आहे.
वरील वाक्यांतील -
१) 'हुशारी' हा शब्द ओजस्वीचा गुण दाखवतो.
२) 'पावित्र्य' हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो.
३) 'संपन्नता' हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो.
    अशा प्रकारे 'हुशारी, पावित्र्य, संपन्नता' ही नावे वस्तूंमधील किंवा व्यक्तींमधील गुणांची नावे आहेत.
    ही नामे वास्तुमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात. अशा नामांना व्याकरणात भाववाचकनाम म्हणतात; म्हणून हुशारी, पावित्र्य, संपन्नता ही भाववाचकनामे आहेत.
(ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचकनाम म्हणतात. उदा. पावित्र्य, संपन्नता, चांगुलपणा, सौंदर्य, मोठेपणा, नम्रता, लबाडी, चपळाई इत्यादी.......)