Advertisement

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

झाशीची राणी लक्ष्मीबाई (मनू)

इंग्रजांविरुद्ध भडकलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी 'मेरी झाँसी नही दूँगी' अशी गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचा जन्म कार्तिक वद्य चतुर्दशी, १९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. तिच्या आईचे नाव होते भागिरथीबाई, वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांच्या दरबारी एक कर्तबगार अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव होते मनकर्णिका. पण घरची मंडळी तिला मनू म्हणूनच हाक मारत.
मनू चार वर्षांची असतानाच तिची आई निवर्तली. वडिलांच्या तालमीत तिचे शिक्षण झाले. ती मुलगी असूनही अत्यंत धाडसी, निर्भय आणि अत्यंत बुद्धिमान होती. मर्दानी पुरुषी खेळांच्या गोडीमुळे तिने तलवार, भालाफेक, धनुष्यबाण, घोड्यावर बसणे इत्यादींचे शिक्षण समरसतेने घेतले होते.
एके दिवशी नानासाहेब पेशवे हत्तीवरून फिरावयास निघाले होते तेव्हा मनूनेही बसण्याचा हट्ट केला. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, ''बाळ मानू, तुझ्या नशिबात हत्ती कुठला? हत्तीवरून फिरण्याची तुझी योग्यता तरी आहे का?'' हे ऐकताच मनू म्हणाली, ''बाबा, तुमच्या मुलीच्या घरी एकच काय, दहा हत्ती पोसलेले दिसतील तुम्हाला!" मनूचे हे सहज बोलणे खरे ठरले. पुढे झाशी संस्थानचे महाराज गंगाधर यांच्याशी विवाह होऊन ती त्यांची लक्ष्मीबाई झाली.
झाशीला आल्यावर लक्ष्मीबाईने आपल्या मैत्रिणींनाही मल्लयुध्द, घोडदौड, ढाल तलवार इत्यादी युद्धकला शिक्षण दिले. १८५१ मध्ये राणीसाहेबांना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने अवघ्या तीन महिन्यांत मरण पावला. त्यामुळे तिने दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला. नंतर गंगाधरपंतही मृत्यू पावले. या प्रचंड दुःखाला सामोरे जात अत्यंत सध्या राहणीने, सावधपणे राज्यकारभार करीत प्रजेच्या हिताच्या सोयी राणीने केल्या.
याचवेळी कुटील नीतीच्या इंग्रजांनी, लॉर्ड डलहौसीने 'दत्तक वारस नामंजूर' करून झाशीचे संस्थान खालसा केले व राणीला पाच हजार रुपयांची पेन्शन जाहीर केली. तेव्हा मात्र राणीने गर्जना केली, 'मेरी झाशी नही दूँगी!' राणीने क्रांतिकारकांच्या मदतीने झाशीचे स्वातंत्र्य टिकविण्याची पराकाष्ठा केली.
शेवटी इंग्रजांचा कुशल सेनापती हा रोज याने आपल्या प्रचंड सैन्यानिशी चाल केली. राणीनेही आपल्या ५१ तोफानिशी बुंदेलखंडी सैनिक, पठाण सैनिक व आपल्या स्त्री सैनिकांसह स्वातंत्र्ययुध्द चालू ठेवले होते. किल्ल्याचे ढासळलेले बुरूज व खिंडारे रातोरात बांधले जात असत. पण ऐनवेळी राणीला मिळणारी तात्या टोपेची मदत इंग्रजांनी रोखून धरली. काही देशद्रोह्यामुळे इंग्रज सैनिक झाशीच्या किल्ल्यात घुसले तेव्हा महिषासुर मादिंनीप्रमाणे राणी शत्रूवर तुटून पडली. झाशीच्या वेढ्यातून धाडसाने बाहेर पडून ती काल्पीला पोहोचली. तेथेही तुंबळ युध्द होऊन ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत करण्यात आला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
इकडे हा रोज, ब्रिगेडियर स्मिथ व स्टुअर्ट यांनी तुफान गोळीबार सुरू गोळीबार सुरू ठेवून राणीशी युध्द सुरू ठेवले. आपला शेवट जवळ आला हे कळून राणीने आपला पुत्र दामोदर याला रामचंद्र देशमुखांच्या स्वाधीन केले व आपला धोडा भरधाव सोडला. पण शत्रूच्या गोळीने डाव साधला होता. वीर व साहसी लक्ष्मीबाईचे देशासाठी बलिदान झाले तो दिवस होता १८ जून १८५८.

बुधवार, ३० जुलै, २०१४

लाला लजपतराय

पंजाबचा सिंह' असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी पंजाबातील लुधियाना येथील जगराव या गावी झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण हे शिक्षक, लेखक होते. आपल्याप्रमाणे लालादेखील समाजसेवी व्हावा असे त्यांना वाटे.
लालाजी कायद्याचे परीक्षा देऊन निष्णात वकील झाले. त्या काळात शाळांतून दिले जाणारे साचेबंद शिक्षण त्यांना पसंत नव्हते. त्यांनी मित्रांसमवेत लाहोरमध्ये 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' काढले. शाळा उघडल्या. भारतीय संस्कृतीची ओळख व देशप्रेम वाढेल असे शाळा-कॉलेजांमधून उपक्रम राबविले. चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. लालाजी जहाल विचारांचे होते. 'वंदे मातरम्' या दैनिकातून व 'पंजाबी' या त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी लेखन करून लोकजागृतीचे कार्य केले.
१९०५ साली सरकारने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे पंजाब आणि सर्व देश असंतोषाने पेटून उठला. याला लाला लजपतराय यांचा पाठिंबा होता हे इंग्रज सरकारने ओळखले होते. त्यातच पंजाबात इंग्रजांनी दडपशाही सुरू केली. हे पाहून लालाजींनी १९०७ मध्ये शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून चळवळ आरंभली. या सरकारविरोधी धोरणामुळे सरकारने त्यांना हद्दपार करून मंडाले येथील तुरुंगात पाठवले.
मंडालेच्या कारावासात १८ महिने काढून परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळीस वाहून घेतले. लो.टिळक, त्रिमूर्ती स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळखली जाऊ लागली.
१९१४ सालामध्ये लालाजी इंग्लंड, जपान, अमेरिका येथे गेले. तिथल्या वास्तव्यात अनेक लेख प्रसिध्द करून भारताची बाजू जगापुढे त्यांनी मांडली. 'इंडियन होमरूल लीग' ची स्थापना केली. तेथून लालाजी भारतात परतले तेव्हा क्राँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आयटक' या कामगार अधिवेशनाचेही ते अध्यक्ष होते. लालाजींनी 'महान अशोक', 'श्रीकृष्ण व त्याची शिकवण', 'छत्रपती शिवाजी', 'मॅझिनी', 'गॅरिबॉल्डी', 'यंग इंडिया' इत्यादी पुस्तके लिहिली.
ब्रिटिश सरकारने १९२८ साली हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कमिशन नेमले होते, त्याचे अध्यक्ष होते 'सायमन'. या मंडळामध्ये एकही हिंदी सभासद न घेतल्यामुळे गांधीजींनी या सायमन मंडळावर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व करीत होते लाला लजपतराय! 'सायमन परत जा' या घोषणांनी शहर दुमदुमले. याचवेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी लालाजींसह सर्वांवर लाठीहल्ला सुरू केला. त्यावेळी लालाजी गरजले, ''माझ्या छातीवरचे हे घाव तुमच्या सत्तेवर पडून सत्ता उलथून टाकणार आहेत!'' याच लाठीमाराने जीवघेणी दुखापत होऊन या पंजाबकेसारीचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.

रविवार, २७ जुलै, २०१४

संयुक्त राष्ट्र दिन (युनो दिन)

राष्ट्राराष्ट्रात भांडणतंटे होऊन दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे नवनव्या संहारक शास्त्रास्त्रांचा पुन्हा वापर झाला तर अखिल मानवाजात नष्ट होईल व जगाचा नाश होईल अशा भीतीने आशावादी अशा काही ५० राष्ट्रांनी सनफ्रान्सिस्को शहरी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर सह्या केल्या. युद्धाप्रमाणेच उपासमार, रोगराई, लोकसंख्या, नैसर्गिक आपत्ती, वर्णभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता इत्यादी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी 'संयुक्त राष्ट्रे' ही संघटना जागतिक पातळीवर कार्यरत झाली.
 
युक्ताच्या भीषण संकटापासून वाचविणे किंबहुना युद्धच होऊ नये आणि शांततामय मार्गाने राष्ट्रांनी आपला विकास साधावा हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. शिवाय परतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत करणे, जगातील स्त्री-पुरुषांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही सुद्धा संघटनेची उद्दिष्टे आहेत. राष्ट्राराष्ट्रातील तणाव व संघार्षांवर उपाय शोधून युध्द टाळण्यासाठी 'संयुक्त राष्ट्रे' प्रयत्न करतात. सारे प्रयत्न असफल झाले तर युद्धात गुंतलेल्या राष्ट्रांना युद्धबंदीचे आवाहन संयुक्त राष्ट्रे करतात. सदस्य राष्ट्रांनी निर्माण केलेली 'शांतिसेना' त्या ठिकाणी शांतता रक्षणाचे कार्य करते.

जगात शांतता नांदावी, सहकार्य व मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत यासाठीची कार्ये पार पाडण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचे काही प्रमुख घटक कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्राची 'आमसभा' राष्ट्रांमधील वाद, गरिबी, लोकसंख्यावाढ, विषमता, निरक्षरता इत्यादी प्रश्न सोडविण्याबाबत मार्गदर्शन करते. 'आर्थिक सामाजिक परिषदही' वर्णभेद, निरक्षरता शिक्षण, आरोग्य, बालकल्याण उपासमार गरिबी इत्यादी जागतिक प्रश्नांवर उपाययोजना सुचवते.

राष्ट्राराष्ट्रांतील वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवरील एक 'आंतरराष्ट्रीय न्यायालय' नेदरलँडस् मधील 'द हेग' या शहरी आहे. संयुक्त राष्ट्रांचा कारभार सांभाळणारे 'सचिवालय' हे मुख्य कार्यालय 'न्यूयॉर्क' शहरात आहे. याप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी काही विशेष संस्था स्थापन केलेल्या आहेत. शिक्षण, विज्ञान, संस्कृती क्षेत्रासाठी 'युनेस्को' ही संस्था मार्गदर्शन करते. आरोग्यसुविधा व विविध साथी, रोग प्रतिबंधक उपाययोजना 'जागतिक आरोग्य संघटना' करते. लहान मुलांना शिक्षण, सोयी व शालेय मुलांना पौष्टिक आहार व शिक्षण साहित्य पुरवण्याचे कार्य 'युनिसेफ' ही संस्था पाहते. 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटना' जगातील कामगारांच्या प्रश्नांवर उपाय सुचवते. अशा 'युनो' च्या बऱ्याच संस्था व त्यांच्या शाखा जगभर कार्यरत आहेत.

जगात काही राष्ट्रे खूप श्रीमंत तर काही गरीब आहेत. इंग्लंड, अमेरिका, जपानसारख्या प्रगत राष्ट्रांनी इथिओपिया, नेपाळ इत्यादी गरीब राष्ट्रांना मदत करावी यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्न करतात. संयुक्त राष्ट्रे ही अनेक राष्ट्रांची संघटना आहे. आंतराष्ट्रीय प्रश्न व मतभेद, युद्ध न करता शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. युनोच्या हा बहुविध कार्याची सर्वांस ओळख होण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रदिन जगभर साजरा जातो.

शनिवार, २६ जुलै, २०१४

नागपंचमी

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी _____ सोनपिवळ्या ऊन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती _____ अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे शुद्धपंचमीला येणारी नागपंचमी! भगवान शंकराच्या गळ्यात आणि मस्तकावर नाग आहे. विष्णू हा तर 'शेषनागावर' प्रत्यक्ष शयन करतो. म्हणून या दोन्ही देवतांच्या पूजाविधीत नागपूजाही महत्त्वाची समजली जाते. वासुदेव 'बाळ' कृष्णाला मथुरेतून गोकुळाकडे नेत होता, तेव्हा पाऊस लागू नये म्हणून नागाने फणा उभारून कृष्णाचे संरक्षण केले तर यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाची पुरी खोड मोडून कृष्ण नागाच्या फण्यावरुन सुखरूप वर आला, हे पाहून सर्पानेच कृष्णाचे रक्षण केले असे सर्वांना वाटले. त्याप्रीत्यर्थ नागराजाची पूजा झाली ती श्रावणपंचमीला.
हा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन! खूप खूप खेळण्याचा, नाचण्या बागडण्याचा, एकत्र येण्याचा हा सण. या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत, काही तळायचे नाही. चिरायचे नाही, भांडणे टाळायची तर सासरच्या मुली माहेरी आवर्जून आणायच्या हा प्रघात आहे.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची वा चित्राची दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून पूजा करतात. काहीजण टोपलीतल्या खऱ्या नागाची दूध वाहून पूजा करतात. खेडेगावी तर शेतातल्या वारुळांची गाणी म्हणत बायका मुली पूजा करतात व म्हणतात.
'चल ग सये वारुळाला, पुजायाला नागोबाला!' महाराष्ट्रात बत्तीस शिराळा येथील शेतकरी दरवर्षी शेकडो नाग पकडून त्यांची पूजा करतात व पुन्हा सुखरूपपणे शेतात सोडून देतात. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन नाग शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. पण नागपुजेच्या दिवशीच नागांची मोठ्या प्रमणात हत्या सुरू झाली आहे. त्याचे विषारी दात पडणे, तोंड शिवणे, नाग, सर्पांची कातडी विकणे इ. क्रूर प्रकार पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मदत करीत आहेत. नागाचे भक्ष्य उंदीर, बेडूक! तरीही दुधाने त्याला पुजून आपण बधिरता आणतो. नाग पुंगीच्या आवाजाने नाही तर हलणाऱ्या वस्तूकडे पाहून फणा हलवतो. नाग डुख धरतो हे खरे नाही.
साप बदला घेऊ शकत नाही. घडलेल्या गोष्टींची स्मृती राहील अशा प्रकारची योजना सापाच्या मेंदूत नाही.भारतात सापाच्या सुमारे २५० जाती आहेत. यापैकी सुमारे पन्नास एक जातीच विषारी आहेत. उदा. नाग, बंगारस, घोणस, फुरसे वगैरे. बिनविषारी सापांमुळे धोका नसतो पण तो ओळखू न-आल्यामुळे साप म्हणजे विषारीच व त्याचा दंश म्हणजे मृत्यूच! म्हणून तो ठेचलाच जावा ह्या विचारात बदल व्हायला हवा. आजकाल सर्व विषावर प्रतिविष उपलब्ध आहे. तेव्हा मांत्रिकांचा सल्ला न घेता सर्पदंशावर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. निसर्गात संतुलन राखणाऱ्या सर्पांच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी आता 'सर्प उद्याने' विकसित करीत आहेत. म्हणून आपणही 'सर्पमित्र' होऊया!

बुधवार, २३ जुलै, २०१४

स्वातंत्र्य दिन

सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, ''मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले.
मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी 'करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद सेने' नेही अभूतपूर्व कामगिरी केली.
विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासागर, लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या, रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला, लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.

रविवार, २० जुलै, २०१४

संस्कृत भाषा दिवस

संस्कृत भाषा मातृभाषेला सर्व दृष्ट्या पोषक आणि संस्कारक्षम आहे. मातृभाषेच्या शुद्धीसाठी, वृद्धीसाठी व जीवनमूल्ये जोपासण्यासाठी आणि संस्कारांसाठी संस्कृत भाषेचे अध्ययन आवश्यक झाले आहे. संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचा फार मोठा साठा आहे. एकेक सुभाषित म्हणजे सूत्ररुपाने, अर्करूपाने सांगितलेला एक उत्तम विचारकण आणि एक उत्तम जीवनमूल्यच होय. बालपणी अर्थ समजून पाठ केलेली सुभाषिते मोठेपणी जीवनपथावर मार्गदर्शक ठरतात. निराश, भग्न मनाला स्फूर्ती देतात. सर्वांना सुसंस्कृत करणारी अशी संस्कृत भाषा वैभवपूर्ण आहे. जगातील पहिले वाड्मय म्हणून ज्या वेदांचा गौरव करण्यात येतो ते वेद, उपनिषदे, ऋचा, प्रार्थनासूक्ते, मंत्र-स्तोत्रे ही संस्कृत भाषेतच लिहिलेली आहेत. भारताने संपूर्ण विश्वालाच संस्कृत भाषेतील ज्ञानभांडाराची देणगी दिलेली आहे. जर्मन माणसांना संस्कृतची महती समजली व त्यांनीच पहिले वेदांचे भाषांतर केले. ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या निरुपणाला दृष्टांत-दाखल्यांना संस्कृत भाषेनेच भूषविले आहे. 'भाषासु मुख्य मधुरा दिव्या गीर्वाण भारती' अशी ही भाषा सर्व प्राणीमात्रांच्या सौख्यासाठी झटणारी आहे. संस्कृत गीतांमध्ये तालबद्धता, गेयता, लालित्य हे गुण आहेतच शिवाय राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, निसर्गप्रेम, राष्ट्रप्रेम इत्यादी जीवनमूल्यांचा आविष्कार आढळतो. त्याचप्रमाणे त्याग, प्रेम, निष्ठा, बंधुता, मानवता यांचे संस्कारही संस्कृत भाषा करते आहे.
आजच्या विज्ञान युगात यंत्राची निर्मिती करताना मनुष्यच भावनाशून्य, संस्कारविहीन 'यंत्र' च बनून गेला आहे! वैज्ञानिक बौद्धिक प्रगती साधताना हार्दिक प्रगती आहे का? भौतिक सुखांच्या श्रीमंतीत मनुष्य लोळू लागला पण हृदयातील श्रीमंती गमावून बसला आहे. सर्व सुखे दाराशी असताना स्वास्थ्य समाधानाला तो पारखा झाला आहे. यासाठी 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन', 'योगः कर्मसु कौशलम्', 'न धैर्यसमं बल', 'आचारः परमो धर्मः' यांसारख्या संस्कृतमधील विचारधनांची गरज आहे.  मनुष्याचे खरे धन पैसा, संपत्ती, दागदागिने, मालमत्ता नसून; त्याचे चारित्र्य, परोपकारिता, कीर्ती, सदाचार हे आहे, हे संस्कृत भाषाध्ययनाने समजते.
'महाभारत' आणि 'रामायण' ही महाकाव्ये इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ३०० या काळात संस्कृतमध्ये रचली गेली. महाभारत हे मूळच्या 'जय' या व्यासमुनी लिखित ग्रंथाचे विस्तारित रूप आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे सांगितलेली भगवद्-गीता, कालिदासाचे मेघदूत, अभिज्ञान शांकुतल, रघुवंश, कुमारवंश इ. ग्रंथ संस्कृमध्ये लिहिले. तसेच गुप्तकालीन भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या नालंदा, पैठण, वलभी, कांची, वाराणसी इ. विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेलाच प्राधान्य होते. त्यावेळेच्या खगोल, वैद्यक, गणित शास्त्रज्ञांनी संस्कृतमधूनच ग्रंथ लिहिले. अशी ही भारताची
    भाषासु मुख्य मधुरा दिव्य गीर्वाणभारती।
    तस्यां हि मधुरं काव्यं तस्मादपि सुभाषितम्।।

भाषांमध्ये मुख्य, दिव्य अशी गीर्वाणभारती (संस्कृत भाषा) आहे. तिच्यातील काव्य मधुर असून सुभाषित अधिक मधुर आहे. अशी ही संस्कृतभाषा वाणी आणि मनाला समृध्द करणारी आहे.
प्रतिष्ठा उंचावणारी भाषा देशाचा एक अमोल ठेवा आहे. म्हणूनच आजच्या शालेय स्तरावर संस्कृत श्लोक, सुभाषिते, गोष्टी, गाणी यांच्या पाठांतर, वक्तृत्व स्पर्धा या दिवशी घेतल्या जातात.

गुरुवार, १७ जुलै, २०१४

बाळ गंगाधर टिळक

आपले सारे आयुष्य देशकार्यासाठी वाहून घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्त्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली होती. आईचे नाव पार्वतीबाई होते तर वडील गंगाधरपंत हे संस्कृत पंडित आणि गणितज्ञ होते. त्यामुळेच टिळकांनीही संस्कृत, गणित विषयांमध्ये प्रभुत्व मिळविले. टिळक पुण्याला कॉलेज शिक्षणासाठी आले तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीकडे मित्र त्यांची चेष्टा करत. मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी एक वर्ष अभ्यास बाजूला ठेऊन व्यायाम केला. या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देशसेवा करताना शारीरिक कष्टांना हसत तोंड दिले.
आपला देश संपन्न व संस्कृती महान असून इंग्रजांच्या गुलामगिरीत का? आपला समाज मागे का? असे टिळकांना प्रश्न पडून लोकजागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला. आगरकर, चिपळूणकरांच्या मदतीने टिळकांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' सुरू केले व फर्ग्युसन कॉलेज काढले.
लोकशिक्षणासाठी टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' वर्तमानपत्रे सुरू करून त्यातून इंग्रज सरकारविरूध्द लेख लिहिले व लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे सार्वजनिक गेणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळविण्याची स्फूर्ती दिली. टिळक इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करीत होते म्हणून इंग्रजांनी त्यांना 'असंतोषाचे जनक' ठरवले.
१९ व्या शतकाच्या अखेरीस प्लेग व दुष्काळात सापडलेल्या जनतेला टिळकांनी गावोगावी जाऊन धीर दिला, मदत केली, त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या अत्याचाराचा धिक्कार केला. स्वातंत्र्य लढ्याला सूत्रबद्धता यावी म्हणून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण असा चौपदरी कार्यक्रम आखला. परदेशी मालाच्या होळ्या पेटल्या. देशभर असंतोषाचा डोंब उसळला. टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून १९०८ साली सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात त्यांना ठेवले गेले. तेथे टिळकांनी 'गीतारहस्य' नावाचा ग्रंथ लिहिला. तेथील सुटकेनंतर त्यांनी अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होमरुल चळवळ' सुरू केली. 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' अशी घोषणा केली. हिंदु-मुस्लिम एकजुटीसाठी त्यांनी 'लखनौ करार' घडवून आणला. कामकरी व बहुजन वर्गास संघटित करणारे ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी झाले.
टिळक विवेकनिष्ठ व विचारी तत्त्वज्ञ होते. 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन द वेदाज्' हे ग्रंथ त्यांनी लिहिले. एक शास्त्रशुध्द पंचांगही सुरू केले. अशा प्रकारे लोकसेवेचे व स्वातंत्र्यलढ्याचे व्रत आयुष्यभर चालविणाऱ्या पहाडांसारख्या टिळकांचे १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबईत देहावसान झाले.