Advertisement

बुधवार, ३० जुलै, २०१४

लाला लजपतराय

पंजाबचा सिंह' असे लोक ज्यांना अभिमानाने म्हणत त्या सिंहासारख्याच शूर असणाऱ्या लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी पंजाबातील लुधियाना येथील जगराव या गावी झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण हे शिक्षक, लेखक होते. आपल्याप्रमाणे लालादेखील समाजसेवी व्हावा असे त्यांना वाटे.
लालाजी कायद्याचे परीक्षा देऊन निष्णात वकील झाले. त्या काळात शाळांतून दिले जाणारे साचेबंद शिक्षण त्यांना पसंत नव्हते. त्यांनी मित्रांसमवेत लाहोरमध्ये 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' काढले. शाळा उघडल्या. भारतीय संस्कृतीची ओळख व देशप्रेम वाढेल असे शाळा-कॉलेजांमधून उपक्रम राबविले. चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. लालाजी जहाल विचारांचे होते. 'वंदे मातरम्' या दैनिकातून व 'पंजाबी' या त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी क्रांतिकारी लेखन करून लोकजागृतीचे कार्य केले.
१९०५ साली सरकारने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे पंजाब आणि सर्व देश असंतोषाने पेटून उठला. याला लाला लजपतराय यांचा पाठिंबा होता हे इंग्रज सरकारने ओळखले होते. त्यातच पंजाबात इंग्रजांनी दडपशाही सुरू केली. हे पाहून लालाजींनी १९०७ मध्ये शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून चळवळ आरंभली. या सरकारविरोधी धोरणामुळे सरकारने त्यांना हद्दपार करून मंडाले येथील तुरुंगात पाठवले.
मंडालेच्या कारावासात १८ महिने काढून परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळीस वाहून घेतले. लो.टिळक, त्रिमूर्ती स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळखली जाऊ लागली.
१९१४ सालामध्ये लालाजी इंग्लंड, जपान, अमेरिका येथे गेले. तिथल्या वास्तव्यात अनेक लेख प्रसिध्द करून भारताची बाजू जगापुढे त्यांनी मांडली. 'इंडियन होमरूल लीग' ची स्थापना केली. तेथून लालाजी भारतात परतले तेव्हा क्राँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आयटक' या कामगार अधिवेशनाचेही ते अध्यक्ष होते. लालाजींनी 'महान अशोक', 'श्रीकृष्ण व त्याची शिकवण', 'छत्रपती शिवाजी', 'मॅझिनी', 'गॅरिबॉल्डी', 'यंग इंडिया' इत्यादी पुस्तके लिहिली.
ब्रिटिश सरकारने १९२८ साली हिंदुस्थानच्या राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कमिशन नेमले होते, त्याचे अध्यक्ष होते 'सायमन'. या मंडळामध्ये एकही हिंदी सभासद न घेतल्यामुळे गांधीजींनी या सायमन मंडळावर बहिष्कार घालण्याचा आदेश दिला. लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व करीत होते लाला लजपतराय! 'सायमन परत जा' या घोषणांनी शहर दुमदुमले. याचवेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी लालाजींसह सर्वांवर लाठीहल्ला सुरू केला. त्यावेळी लालाजी गरजले, ''माझ्या छातीवरचे हे घाव तुमच्या सत्तेवर पडून सत्ता उलथून टाकणार आहेत!'' याच लाठीमाराने जीवघेणी दुखापत होऊन या पंजाबकेसारीचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा