Advertisement

शनिवार, २६ जुलै, २०१४

नागपंचमी

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी _____ सोनपिवळ्या ऊन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती _____ अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे शुद्धपंचमीला येणारी नागपंचमी! भगवान शंकराच्या गळ्यात आणि मस्तकावर नाग आहे. विष्णू हा तर 'शेषनागावर' प्रत्यक्ष शयन करतो. म्हणून या दोन्ही देवतांच्या पूजाविधीत नागपूजाही महत्त्वाची समजली जाते. वासुदेव 'बाळ' कृष्णाला मथुरेतून गोकुळाकडे नेत होता, तेव्हा पाऊस लागू नये म्हणून नागाने फणा उभारून कृष्णाचे संरक्षण केले तर यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाची पुरी खोड मोडून कृष्ण नागाच्या फण्यावरुन सुखरूप वर आला, हे पाहून सर्पानेच कृष्णाचे रक्षण केले असे सर्वांना वाटले. त्याप्रीत्यर्थ नागराजाची पूजा झाली ती श्रावणपंचमीला.
हा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन! खूप खूप खेळण्याचा, नाचण्या बागडण्याचा, एकत्र येण्याचा हा सण. या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत, काही तळायचे नाही. चिरायचे नाही, भांडणे टाळायची तर सासरच्या मुली माहेरी आवर्जून आणायच्या हा प्रघात आहे.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाची वा चित्राची दुर्वा, फुले, दूध, लाह्या वाहून पूजा करतात. काहीजण टोपलीतल्या खऱ्या नागाची दूध वाहून पूजा करतात. खेडेगावी तर शेतातल्या वारुळांची गाणी म्हणत बायका मुली पूजा करतात व म्हणतात.
'चल ग सये वारुळाला, पुजायाला नागोबाला!' महाराष्ट्रात बत्तीस शिराळा येथील शेतकरी दरवर्षी शेकडो नाग पकडून त्यांची पूजा करतात व पुन्हा सुखरूपपणे शेतात सोडून देतात. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन नाग शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. पण नागपुजेच्या दिवशीच नागांची मोठ्या प्रमणात हत्या सुरू झाली आहे. त्याचे विषारी दात पडणे, तोंड शिवणे, नाग, सर्पांची कातडी विकणे इ. क्रूर प्रकार पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास मदत करीत आहेत. नागाचे भक्ष्य उंदीर, बेडूक! तरीही दुधाने त्याला पुजून आपण बधिरता आणतो. नाग पुंगीच्या आवाजाने नाही तर हलणाऱ्या वस्तूकडे पाहून फणा हलवतो. नाग डुख धरतो हे खरे नाही.
साप बदला घेऊ शकत नाही. घडलेल्या गोष्टींची स्मृती राहील अशा प्रकारची योजना सापाच्या मेंदूत नाही.भारतात सापाच्या सुमारे २५० जाती आहेत. यापैकी सुमारे पन्नास एक जातीच विषारी आहेत. उदा. नाग, बंगारस, घोणस, फुरसे वगैरे. बिनविषारी सापांमुळे धोका नसतो पण तो ओळखू न-आल्यामुळे साप म्हणजे विषारीच व त्याचा दंश म्हणजे मृत्यूच! म्हणून तो ठेचलाच जावा ह्या विचारात बदल व्हायला हवा. आजकाल सर्व विषावर प्रतिविष उपलब्ध आहे. तेव्हा मांत्रिकांचा सल्ला न घेता सर्पदंशावर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. निसर्गात संतुलन राखणाऱ्या सर्पांच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी आता 'सर्प उद्याने' विकसित करीत आहेत. म्हणून आपणही 'सर्पमित्र' होऊया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा