Advertisement

रविवार, २० जुलै, २०१४

संस्कृत भाषा दिवस

संस्कृत भाषा मातृभाषेला सर्व दृष्ट्या पोषक आणि संस्कारक्षम आहे. मातृभाषेच्या शुद्धीसाठी, वृद्धीसाठी व जीवनमूल्ये जोपासण्यासाठी आणि संस्कारांसाठी संस्कृत भाषेचे अध्ययन आवश्यक झाले आहे. संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचा फार मोठा साठा आहे. एकेक सुभाषित म्हणजे सूत्ररुपाने, अर्करूपाने सांगितलेला एक उत्तम विचारकण आणि एक उत्तम जीवनमूल्यच होय. बालपणी अर्थ समजून पाठ केलेली सुभाषिते मोठेपणी जीवनपथावर मार्गदर्शक ठरतात. निराश, भग्न मनाला स्फूर्ती देतात. सर्वांना सुसंस्कृत करणारी अशी संस्कृत भाषा वैभवपूर्ण आहे. जगातील पहिले वाड्मय म्हणून ज्या वेदांचा गौरव करण्यात येतो ते वेद, उपनिषदे, ऋचा, प्रार्थनासूक्ते, मंत्र-स्तोत्रे ही संस्कृत भाषेतच लिहिलेली आहेत. भारताने संपूर्ण विश्वालाच संस्कृत भाषेतील ज्ञानभांडाराची देणगी दिलेली आहे. जर्मन माणसांना संस्कृतची महती समजली व त्यांनीच पहिले वेदांचे भाषांतर केले. ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या निरुपणाला दृष्टांत-दाखल्यांना संस्कृत भाषेनेच भूषविले आहे. 'भाषासु मुख्य मधुरा दिव्या गीर्वाण भारती' अशी ही भाषा सर्व प्राणीमात्रांच्या सौख्यासाठी झटणारी आहे. संस्कृत गीतांमध्ये तालबद्धता, गेयता, लालित्य हे गुण आहेतच शिवाय राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, निसर्गप्रेम, राष्ट्रप्रेम इत्यादी जीवनमूल्यांचा आविष्कार आढळतो. त्याचप्रमाणे त्याग, प्रेम, निष्ठा, बंधुता, मानवता यांचे संस्कारही संस्कृत भाषा करते आहे.
आजच्या विज्ञान युगात यंत्राची निर्मिती करताना मनुष्यच भावनाशून्य, संस्कारविहीन 'यंत्र' च बनून गेला आहे! वैज्ञानिक बौद्धिक प्रगती साधताना हार्दिक प्रगती आहे का? भौतिक सुखांच्या श्रीमंतीत मनुष्य लोळू लागला पण हृदयातील श्रीमंती गमावून बसला आहे. सर्व सुखे दाराशी असताना स्वास्थ्य समाधानाला तो पारखा झाला आहे. यासाठी 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन', 'योगः कर्मसु कौशलम्', 'न धैर्यसमं बल', 'आचारः परमो धर्मः' यांसारख्या संस्कृतमधील विचारधनांची गरज आहे.  मनुष्याचे खरे धन पैसा, संपत्ती, दागदागिने, मालमत्ता नसून; त्याचे चारित्र्य, परोपकारिता, कीर्ती, सदाचार हे आहे, हे संस्कृत भाषाध्ययनाने समजते.
'महाभारत' आणि 'रामायण' ही महाकाव्ये इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ३०० या काळात संस्कृतमध्ये रचली गेली. महाभारत हे मूळच्या 'जय' या व्यासमुनी लिखित ग्रंथाचे विस्तारित रूप आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे सांगितलेली भगवद्-गीता, कालिदासाचे मेघदूत, अभिज्ञान शांकुतल, रघुवंश, कुमारवंश इ. ग्रंथ संस्कृमध्ये लिहिले. तसेच गुप्तकालीन भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या नालंदा, पैठण, वलभी, कांची, वाराणसी इ. विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेलाच प्राधान्य होते. त्यावेळेच्या खगोल, वैद्यक, गणित शास्त्रज्ञांनी संस्कृतमधूनच ग्रंथ लिहिले. अशी ही भारताची
    भाषासु मुख्य मधुरा दिव्य गीर्वाणभारती।
    तस्यां हि मधुरं काव्यं तस्मादपि सुभाषितम्।।

भाषांमध्ये मुख्य, दिव्य अशी गीर्वाणभारती (संस्कृत भाषा) आहे. तिच्यातील काव्य मधुर असून सुभाषित अधिक मधुर आहे. अशी ही संस्कृतभाषा वाणी आणि मनाला समृध्द करणारी आहे.
प्रतिष्ठा उंचावणारी भाषा देशाचा एक अमोल ठेवा आहे. म्हणूनच आजच्या शालेय स्तरावर संस्कृत श्लोक, सुभाषिते, गोष्टी, गाणी यांच्या पाठांतर, वक्तृत्व स्पर्धा या दिवशी घेतल्या जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा