Advertisement

रविवार, २७ जुलै, २०१४

संयुक्त राष्ट्र दिन (युनो दिन)

राष्ट्राराष्ट्रात भांडणतंटे होऊन दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे नवनव्या संहारक शास्त्रास्त्रांचा पुन्हा वापर झाला तर अखिल मानवाजात नष्ट होईल व जगाचा नाश होईल अशा भीतीने आशावादी अशा काही ५० राष्ट्रांनी सनफ्रान्सिस्को शहरी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर सह्या केल्या. युद्धाप्रमाणेच उपासमार, रोगराई, लोकसंख्या, नैसर्गिक आपत्ती, वर्णभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता इत्यादी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी 'संयुक्त राष्ट्रे' ही संघटना जागतिक पातळीवर कार्यरत झाली.
 
युक्ताच्या भीषण संकटापासून वाचविणे किंबहुना युद्धच होऊ नये आणि शांततामय मार्गाने राष्ट्रांनी आपला विकास साधावा हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. शिवाय परतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत करणे, जगातील स्त्री-पुरुषांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही सुद्धा संघटनेची उद्दिष्टे आहेत. राष्ट्राराष्ट्रातील तणाव व संघार्षांवर उपाय शोधून युध्द टाळण्यासाठी 'संयुक्त राष्ट्रे' प्रयत्न करतात. सारे प्रयत्न असफल झाले तर युद्धात गुंतलेल्या राष्ट्रांना युद्धबंदीचे आवाहन संयुक्त राष्ट्रे करतात. सदस्य राष्ट्रांनी निर्माण केलेली 'शांतिसेना' त्या ठिकाणी शांतता रक्षणाचे कार्य करते.

जगात शांतता नांदावी, सहकार्य व मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत यासाठीची कार्ये पार पाडण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचे काही प्रमुख घटक कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्राची 'आमसभा' राष्ट्रांमधील वाद, गरिबी, लोकसंख्यावाढ, विषमता, निरक्षरता इत्यादी प्रश्न सोडविण्याबाबत मार्गदर्शन करते. 'आर्थिक सामाजिक परिषदही' वर्णभेद, निरक्षरता शिक्षण, आरोग्य, बालकल्याण उपासमार गरिबी इत्यादी जागतिक प्रश्नांवर उपाययोजना सुचवते.

राष्ट्राराष्ट्रांतील वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवरील एक 'आंतरराष्ट्रीय न्यायालय' नेदरलँडस् मधील 'द हेग' या शहरी आहे. संयुक्त राष्ट्रांचा कारभार सांभाळणारे 'सचिवालय' हे मुख्य कार्यालय 'न्यूयॉर्क' शहरात आहे. याप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी काही विशेष संस्था स्थापन केलेल्या आहेत. शिक्षण, विज्ञान, संस्कृती क्षेत्रासाठी 'युनेस्को' ही संस्था मार्गदर्शन करते. आरोग्यसुविधा व विविध साथी, रोग प्रतिबंधक उपाययोजना 'जागतिक आरोग्य संघटना' करते. लहान मुलांना शिक्षण, सोयी व शालेय मुलांना पौष्टिक आहार व शिक्षण साहित्य पुरवण्याचे कार्य 'युनिसेफ' ही संस्था पाहते. 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटना' जगातील कामगारांच्या प्रश्नांवर उपाय सुचवते. अशा 'युनो' च्या बऱ्याच संस्था व त्यांच्या शाखा जगभर कार्यरत आहेत.

जगात काही राष्ट्रे खूप श्रीमंत तर काही गरीब आहेत. इंग्लंड, अमेरिका, जपानसारख्या प्रगत राष्ट्रांनी इथिओपिया, नेपाळ इत्यादी गरीब राष्ट्रांना मदत करावी यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्न करतात. संयुक्त राष्ट्रे ही अनेक राष्ट्रांची संघटना आहे. आंतराष्ट्रीय प्रश्न व मतभेद, युद्ध न करता शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. युनोच्या हा बहुविध कार्याची सर्वांस ओळख होण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रदिन जगभर साजरा जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा