Advertisement

मंगळवार, १५ जुलै, २०१४

कर्मवीर अण्णाभाऊ पाटील

सभेत मोठी भाषणे ठोकणारे, वृत्तपत्रांत फोटो छापून आणणारे, गळ्यात मोठमोठे हार घालून घेऊन स्वतःचीच स्तुतिसुमने अनेकांकडून गाऊन घेणारे शेकडो पुढारी आपल्याला सर्वत्र दिसतात; पण काहीही वल्गना न करता, मूकपणाने डोंगराएवढे काम करणारे अण्णाभाऊंसारखे कार्यकर्ते फार थोडेच.
१८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी एका शेतकरी कुटुंबात भाऊरावांचा जन्म झाला. घरातील अडचणींमुळे भाऊरावांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. अज्ञान हे दारिद्र्याचे व दुःखाचे कारण आहे हे भाऊरावांच्या लक्षात आले आणि त्याचवेळी त्यांनी बहुजन समाजात अगदी तळागाळापर्यंत शिक्षण नेऊन पोहोचवण्याचा संकल्प सोडला.
आपल्या संकल्पानुसार ते कामाला लागले. गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे प्रथम त्यांची राहण्याची, जेवणाखाण्याची सोय झाली पाहिजे हे लक्षात घेऊन अण्णांनी १९१० मध्ये दुधगाव येथे आणि १९१९ मध्ये काळे येथे अशी दोन वसतिगृहे सुरू केली. नंतर १९२४ मध्ये साताऱ्याला 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' सुरू केले. अण्णा या कार्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी जसे हिंडत, त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्याच्या शोधातही ते सतत फिरत असत. ते आपल्या विद्यार्थांना सांगत की, 'कमवा आणि शिका.' त्यासाठी अण्णा धनिकांकडून पडिक जमिनी मिळवत आणि आपल्या विद्यार्थांकडून पडित जमिनीचे उत्कृष्ट जमिनीत परिवर्तन करून घेत.
हे मौलिक कार्य करत असताना अण्णांनी आपला व आपल्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही. त्यांचे स्वतःचे बँकेत खाते नव्हते. उलट आपल्या पत्नीचे सर्व दागिने त्यांनी या गरीब विद्यार्थ्यासाठी खर्च केले.
आज महाराष्ट्रात अण्णांनी काढलेल्या संस्थेच्या शाळा, कॉलेजांचे जाळे पसरलेले आहे. 'तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही' हाच संदेश त्यांनी आपल्या शेकडो शिष्यांना दिला!
९ मे १९५९ रोजी अण्णांचे निधन झाले; पण आपल्या कार्याने कर्मवीर अण्णाभाऊ पाटील चिरंजीव झाले.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा