Advertisement

मंगळवार, १५ जुलै, २०१४

नेताजी सुभाषचंद्र बोस

कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात आपण सारे भारतीय एकदिलाने 'जय हिंद' ही घोषणा करत असतो. ही घोषणा आपल्याला दिली आहे आपले नेते सुभासाचंद्र बोस यांनी.
२३ जानेवारी १८९६ मध्ये बंगालमधील कटक या गावात, एका सुखवस्तू घरात सुभाषचंद्रांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांची बुद्धी तल्लख होती. कॉलेजात गेल्यावर त्यांनी तेथील विद्यार्थ्यांचे नेतृत्व स्वीकारले. अन्याय व अपमान यांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. आय्.सी.एस्. परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावरही ब्रिटिश साम्राज्याशी विश्वासपात्र राहण्याची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला आणि शासकीय सन्मानापासून ते सदैव दूर राहिले.
नंतर राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाल्यावर त्यांना अनेकदा कारावास सहन करावा लागला. एकदा ते अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्षही झाले; पण मतभेद झाल्यावर कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 'फॉरवर्ड-ब्लॉक' नावाची संघटना सुरू केली. सन १९४१ मध्ये स्वतःच्या घरात स्थानबद्ध असतानाच सुभाषबाबू गुप्तपणे भारताच्या बाहेर पडले. अनेक हालअपेष्टा सोसत ते जर्मनीला पोहोचले. तेथून पुढे पाणबुडीने प्रवास करत ते जपानला पोहोचले. ब्रिटिशांच्या सैन्यात असलेले अनेक भारतीय सैनिक जपान्यांच्या कैदेत होते. त्यांच्याशी संपर्क साधून सुभाषबाबूंनी १९४३ च्या ऑगस्टमध्ये 'आझाद हिंद सेना' निर्माण केली. त्यांनी आपल्या सैनिकांना संदेश दिला, 'चलो दिल्ली'. अशा प्रकारे सुभाषचंद्र इंग्रजांच्या ताब्यार असलेल्या भारतावर आक्रमण करून भारताला स्वतंत्र करू इच्छित होते. विजय त्यांच्या टप्प्यात आला होता.
परंतु, अचानक युद्धाचा रंग पालटला. जपानला शत्रुराष्ट्रांकडून पराभव पत्करावा लागला. सुभाषबाबू मलायाला जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते पुन्हा कोणालाच दिसले नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर खटले भरले.
सुभाषबाबू सांगत, 'कोणतेही बलिदान फुकट जात नाही.' त्याचा अनुभव त्यांच्या हौतात्म्यातून दिसून आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा