Advertisement

बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

सावित्रीबाई फुले

सावत्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री-शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या. पुण्यात स्त्री-शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा जोतिबांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हां जोतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.
सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दुःखांपासून मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व क्षण वेचला. सावित्रीबाईंनी आपल्याला मूल न झाल्यामुळे जोतिबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला, पण जोतिबांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून एका थोर समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून, धैर्याने वागून जोतिबांचे जीवन धन्य करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण मिळाले. जोतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असताना, त्यांच्या पवित्र कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतिबांच्या वडिलांनी केला. त्या काळात स्त्रियांना शिकविले जात नसे. जोतिबांच्या वडिलांना असे वाटले की, त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, ४२ पिढ्या नरकात जातील. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबाही स्त्री-शिक्षण चळवळीचे नेते होते.
त्यांच्या मुलींच्या शाळेत, मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यामध्ये त्या काळात हे कार्य म्हणजे एक चाचेंचा विषय झाला होता. पण आपल्या कार्यामुळे जोतिबा व सावित्रीबाईंनी एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता. सावित्रीबाईंजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईंनी महार-मांग, कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली. त्यांच्या सेवावृत्तीने केलेल्या कामाचा गौरव इंग्रज सरकारने पुण्याला विश्रामबागवाड्यात केला. स्त्री-शिक्षिकेचा हा पहिला गौरव होता. असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले. शाळेमध्ये सावित्रीबाईं मुख्याध्यापिका झाल्यावर त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे काम करीत. सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातन्यांनी केला. तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला.
रस्त्यातून जात असताना एखादी कर्मठ बाई शिव शिव करीत, तिच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी. त्या शेणाची घाण, सावित्रीबाई न रागावता स्वच्छ करीत. थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झाडलेला कचरा माडीवरून त्यांच्या अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत. तेव्हा हसून सावित्रीबाई म्हणत, 'बरे झाले बाई, तुम्ही ही फुले टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला, ही फुलेच मला माझ्या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील.' आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई. एकदा शाळेकडे जाताना, चौकात चार-पाच गुंड मुले बसली होती. सावित्रीबाई तिथे आल्यावर त्यांच्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला, "मुलींना आणि महार-मांगांना शिकविणे तू बंद करा. नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही." हे शब्द ऐकताच त्या गुंडाला तिने ताड ताड अशा तीन मुस्काटीत ठेवून दिल्या. तो गुंड मुलगा गाल चोळतच राहिला. अशा संकटांना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या, तरी जोतिरावांनी एक पट्टेवाला त्यांच्यासोबत दिला. जोतिरावांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करून करीत असत.
दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना, त्यांनी "इतक्या थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे त्या चालकांना भूषणावह आहे" असा शेरा दिला होता. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे, अशी रूढी होती. तिला अपशकुनी समजले जाई. तिला पांढरे वस्त्र परिधान करून घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. परंतु लोक ऐकनात. तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो, हे केवढे पाप आहे, याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनस जाऊ नका असे सांगितले. न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला. तो खूप गाजला.
सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरू केले. बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले. भ्रूणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे, असे त्यांनी पाहिले. विधवांसाठी सुरक्षीतपणे बाळंतपण व्हावे, म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या.
अस्पृस्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे हौद खुले केले. त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता. इ.स. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले.
सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८९० साली प्रसिद्ध झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिध्द करून दाखविले.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

स्वामी विवेकानंद

भारताच्या पुनरुत्थानाच्या काळात आणि हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवनाच्या काळात स्वामी विवेकानंदाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय सामान्य जनतेला दैन्यावस्थेतून आणि अज्ञानातून सोडवण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले.
स्वामीजींचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव होते भुवनेश्वरी व पित्याचे नाव विश्वनाथबाबू दत्त. त्यांचे पाळण्यातील नाव विरेश्वर असे होते. बिले, नरेंद्र अशा नावानेही त्यांना हाक मारली जाई. बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. बालवयातच त्यांचे चित्त एकाग्र होत असे. बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. झाडावर ब्रह्यराक्षस वगैरे कोणी राहत नाही. हे सगळे खोटे आहे त्यांनी लहानपणी झाडावर चढून सिध्द करून दाखविले. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हे त्यांचे आदर्श होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथे झाले. शाळेत असतानाच त्यांचे वडील अभ्यासाबरोबर साहित्य, तत्त्वज्ञान इ. चा अभ्यास त्यांच्याकडून करून घेत. ईश्र्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांचे वक्तृत्वाबद्दल खूप कौतुक केले होते. जनरल असेंब्ली या कॉलेजातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बी.ए. झाले. प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत असताना Ecstasy ह्या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून झाला. त्याचा अर्थ समाधी. त्यांची खरोखरच समाधी लागली. नरेंद्राने तेव्हापासून समाधी, ईश्वराचा शोध इ. विषयी चिंतन सुरू केले आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे आले.
रामकृष्ण परमहंसांकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण ईश्वर पहिला आहे काय? असा प्रश्न रामकृष्णांना विचारताच त्यांनी 'हो' उत्तर दिले. मलाही ईश्वर पाहायचा आहे, ही तळमळ नरेंद्राला लागली. नरेंद्र चिंतन, मनन, ध्यान-धारणा करू लागला. योग्य वेळ येताच रामकृष्णांनी त्यांना आपले आध्यात्मिक धन संक्रमित केले. "मानव सेवा हीच ईश्वरसेवा" हे रामकृष्णांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले आणि मनुष्यसेवा करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याचे त्यांनी ठरवले. नदी, नाले, वाळवंट, पर्वत तुडवीत ते फिरत राहिले. लोकांचे दुःख, दैन्य, अज्ञान, रोगराई, उपासमार, इ. निरीक्षण केले. देशाची सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने नि:स्वार्थ भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. त्यांच्यामधील पुरुषार्थ जागरूक झाला. भारतभ्रमणात ते कन्याकुमारीला पोहोचले. २५ ते २७ डिसेंबर १८९२ असे तीन दिवस त्यांनी खडकावर राहून चिंतन केले आणि लोकांना दैन्यावास्थेतून बाहेर काढले पाहिजे असे जीवितकार्य त्यांनी ठरविले.
"उठा, जागे व्हा चांगले कार्य करा, थांबू नका". हा अमृत बोध त्यांना झाला. अमेरिकेत सर्वधर्मपरिषद भरवली जात आहे, असे त्यांना समजले. त्यासाठी तिथे जाण्याचे त्यांनी ठरविले. ११ सप्टेंबर १८९३ ला ते शिकागोला पोहोचले. विवेकानंदांची भाषणाची वेळ आल्यावर आपल्या तुरुंचे स्मरण करून त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो" हे शब्द उच्चारले. टाळ्यांचा कडकडात झाला. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली. स्वामीजींचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदये जिंकून घेत.
पुढे इंग्लंडला गेल्यावर मागरिट नोबल त्यांच्या शिष्या झाल्या. तिचे नाव त्यांनी 'भगिनी निवेदिता' असे ठेवले. परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८ मध्ये 'रामकृष्ण मठ' उभा केला. नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मठाचे ध्येयधोरण हे आध्यात्मिक व मानवसेवा स्वरूपाचे होते. त्यांच्या मते, पश्चिमेने बाह्य जग तर पूर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते. पण दोघांनी हातात हात घालून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे. म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेद राहणार नाही. विज्ञानाच्या सहाय्याने सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे पण धर्मामुळे मानवाच्या चित्ताचे शुध्दीकर्म झाले पाहिजे व धर्माने संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून उदार व व्यापक दृष्टिकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजे असे ते म्हणत.
स्वामीजी संपूर्ण मानवजातीच्या आध्यात्मिक उद्धाराचे कार्य करणारे मार्गदर्शक स्तंभ होते. वेदान्त हा प्रत्यक्ष मानवाच्या ऐहिक जीवनात कसा सुखकारक, समृध्द व उन्नत असू शकतो, हे त्यांनी आपल्या विचारांनी व कार्याने दाखवून दिले. त्यांच्या वेदान्ताला 'व्यावहारिक वेदान्त' म्हणतात. "जेव्हा तुम्ही सर्वांकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल, तेव्हा ही स्त्री, हा पुरुष असा भेद तुमच्यात राहणार नाही" असे स्वामीजी म्हणत.
शेवटी असे कार्य करीत असताना आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते पंचतत्वात विलीन झाले. आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्याने अमर झाले. "मानवसेवा हीच ईश्वरसेवा"

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

रवींद्रनाथ टागोर

जीवनपरिचय - प्रतिभाशाली साहित्यामुळे जागतिक पातळीवरील नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले, त्या रवींद्रनाथ टागोरांचे नाव भारतातल्या प्रत्येक घराघरात माहीत आहे. त्यांचा 'गीतांजली' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यात जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षणपद्धतीचे प्रवर्तक  म्हणून रवींद्रनाथ टागोरांचे नाव घ्यावे लागते. रवींद्रनाथांचे सर्व वाड्मय हे ४० खंडांमध्ये प्रसिध्द झालेले आहे. रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते.
रवींद्रनाथांच्या मातेचे नाव शारदादेवी आणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ. त्यांना आठ भाऊ व सहा बहिणी होत्या. रवींद्रनाथांचा जन्म ७ मे १८६१ रोजी अत्यंत समृध्द घराण्यात झाला. घरी संपन्नता असूनही रवींद्रनाथ अगदी साधेपणाने राहत. त्याकाळात घरी मुलांना शिकवावे ही पद्धत फार रूढ होती. शाळा संपल्यावर ते घरी आले की, व्यायाम शिकवणारे शिक्षक येत. नंतर चित्रकलेसाठीही त्यांच्या वडिलांनी शिक्षक नेमले होते. मग इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षक येत. ते सात - आठ वर्षांचे असतानाच कविता करीत. काव्याबरोबर ते संगीतही शिकले. त्यांना बॅरिस्टर पदवी प्राप्त व्हावी म्हणून वडिलांनी इंग्लंडला पाठविले. पण कायद्याचे शिक्षण त्यांना आवडत नसे. शेवटी ते इंग्लंडहून परत आले. इंग्लंडमध्ये असताना त्यांना लोकगीते फार आवडली. त्या लोकगीतांच्या चाली त्यांनी आत्मसात केल्या. या चालीवर त्यांनी 'वाल्मिकी-प्रतिभा' या आपल्या संगीतीकेमधील गीते लिहिली. १८८३ साली त्यांचा विवाह झाला. मृणालिनी हे त्यांच्या पत्नीचे नाव. त्यांना तीन कन्या व दोन मुले झाली. रवींद्रनाथांनी कलकत्त्यापासून जवळच असणाऱ्या शांतिनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्रीनिकेतन ही संस्था काढली.
कुटिरोद्योगाची कल्पना, शेतकऱ्यांसाठी कृशिबँक, हितैषीसभा त्यांनी सुरू केल्या. नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात शिक्षण द्यावे, यावर रवींद्रनाथांचा भर होता. वृक्षाच्या सावलीत, तपोवनाच्या कल्पनेवर आधारीत त्यांनी शिक्षणाची नवी पद्धती सुरू केली. तेथे शिष्यांच्या चित्ताला पल्लवित करणारे गुरू त्यांना निर्माण करायचे होते. तेथील आश्रमात त्यांनी भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन केले. त्याचप्रमाणे शेती-शिक्षण आणि ग्रामसुधारणा यांचेही शिक्षण तेथे दिले जाई. शांतिनिकेतन विद्यालयातूनच पुढे विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. तेथे जगभरातून आलेले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. टागोरांनी लेखन, चित्रकला, संगीत, शिक्षण, धर्म इ. क्षेत्रांत नावीन्य निर्माण केले. टागोरांना ध्यानात रंगणे आवडे, तसेच काव्यामध्ये गूढगुंजन करण्याचीही त्यांची सवय होती. पण असे असूनही भारतमातेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. वंगभंगचळवळीत त्यांनी तेथे सभेसाठी जमलेल्या निष्पाप भारतीयांवर गोळीबार झाला. हे रवींद्रनाथांना आवडले नाही म्हणून ब्रिटिशांनी त्यांना दिलेली 'सर' ही पदवी ब्रिटिश सरकारकडे परत पाठवली.
रवींद्रनाथांचे 'जन गण मन' हे राष्ट्रगीत झाले तर 'आमार सोनार बांगला' हे बांगला देशाचे राष्ट्रगीत झाले. रवींद्रनाथ टागोर हे सौंदर्यवादी कवी व तत्त्वज्ञ होते. ते सत्य व शिव यांचा साक्षात्कार सौंदर्याव्दारा घडवीत.
शेवटी एका प्रार्थनेत ते म्हणतात, ''ईश्वराकडे माणसाने वैभव, समृद्धी, श्रीमंती व उन्नती, स्वतः आळशी राहून न मागता जीवन सर्व दृष्टींनी फुलवण्यासाठी ईश्वराने आपणास म्हणजे माणसास बळ, निर्भयता, सहनशीलता, आत्मविश्वास, श्रद्धानिष्ठा व स्वतःचे आंतरिक सामर्थ्य सतत मिळू दे."

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

दूरदर्शनने आम्हांला काय दिले?

'दूरदर्शनने आम्हांला काय दिले?' खरोखरच या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण भारतात दूरदर्शन येऊन आता पंचवीस वर्षे होऊन गेली. २ ऑक्टोबर, १९७२ रोजी मुंबईत टी.व्ही. सुरू झाला. त्यापूर्वी दिल्लीत टी.व्ही. होता; पण तो इतक्या लोकांपर्यंत पोचला नव्हता. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांनी दूरदर्शनचा प्रसार खेडोपाडी व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. 'लोकांना भाकरी हवी आहे, टी.व्ही. नको,' अशी परखड टीकाही झाली. पण या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की "भाकरीही देऊ; पण विचारांची भूक भागवण्यासाठी दूरचित्रवाणी हवीच."
आता ही दूरचित्रवाणी दूरवर पोचली आहे. आता शहराप्रमाणे गावागावांतून, बंग्ल्यांतून, उंच इमारतींतून त्याचप्रमाणे सर्वत्र झोपडपट्टीतून, गोरगरिबांच्या वस्त्यांतूनही दूरदर्शन ही नित्याची गोष्ट झाली आहे. आपण दूरदर्शनवरच्या विविध वाहिन्या पाहतो, तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. केवळ मराठी भाषेत कार्यक्रम सादर करणाऱ्या सहा वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे आज अनेक कलावंत, तंत्रज्ञ यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खरे कार्यक्षेत्र मिळाले आहे. नवे कलावंत पुढे येत आहेत. जुन्या चांगल्या साहित्याची ओळख अगदी सर्वसामान्य प्रेक्षकापर्यंत पोचत आहे. ही दूरदर्शनने दिलेली भेट नाही का?
मनोरंजन आणि प्रबोधन हे दूरदर्शन-निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हाच दूरदर्शनचा मनोरंजनाचा गुण आता टीकेला कारण होत आहे. दूरदर्शन संचापुढे माणसे-मुले चिकटून बसतात. त्यामुळे वाचनाची सवय राहत नाही. मुले मोकळ्या हवेत खेळत नाहीत, हा आरोप दूरदर्शनवर केला जातो. विद्वान मंडळी दूरदर्शनला 'इडियट बॉक्स' म्हणतात. त्यांच्या मते दूरदर्शन पाहणारी माणसे विचार करत नाहीत. काही अंशी हे आरोप खरेही असतील. पण त्याचबरोबर या विचारवंतांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, पुस्तके वाचून त्यावर चिंतन करणारा समाज आपल्याकडे किती आहे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांनी आपले वाचन आजही सोडले नाही.
उरलेला जो न वाचणारा किंवा ज्याला वाचताच येत नाही, असा केवढा तरी मोठा समाजाचा भाग आहे. त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे काम 'दूरचित्रवाणी' नक्कीच करते. दुरचित्रवाणीमुळे आपला तळागाळातला समाज बऱ्याच नवीन गोष्टी जाणू लागला आहे. एशियाड, ऑलिम्पिक अशा स्पर्धा आज वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. पण दुरचित्रवाणीमुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉलबरोबर कबड्डी, खोखोचे सामनेही बारकाईने पाहिले जातात. प्राणिजगताविषयी भौगोलिक माहिती देणारी वाहिनी (नॅशनल जिआग्राफी) अतिशय अपूर्व माहिती प्रेक्षकाला देते. बातम्या या दृक् झाल्यामुळे ती ती स्थळे समोर येतात. सारे जग जवळ येते. शेतकरी, कामगार यांचे प्रश्न दुरचित्रवाणीवर मांडले जातात. आपल्या घरात एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना दूरचित्रवाणी हे एक वरदानच ठरले आहे.
दूरदर्शन भरभरून देत आहे. त्यांतून आपण किती व काय घ्यायचे, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

पत्रलेखन

आज जग जवळ आले आहे. म्हणजे जगात दूरवर असलेल्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग आज उपलब्ध आहेत.
उदा.
दूरध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी. तरीपण आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. पत्राच्या माध्यमातून आपण आपले मन दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकतो. म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे.
पत्राचे मुख्य २ प्रकार :
१) कौटुंबिक / घरगुती पत्र    २) व्यावसा
ते पुढील प्रमाणे -

१) कौटुंबिक / घरगुती पत्रे
काही गोष्टी लक्षात घ्यावात -
- पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख घालावी.
- पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.
- पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
- पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना 'शिरसाष्टांग नमस्कार' किंवा 'शि.सा. नमस्कार' आणि कुटुंबातील इतरांना सा.न. / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
- समारोपाचा योग्य मायना असावा.
- पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.

२) व्यावसायिक पत्र

- व्यावसायिक पत्रात, पत्राच्या वरच्या भागात '।।श्री।।' वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही.
- पत्राची सुरुवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.
- पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.
- त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तोसुद्धा लिहावा.
- योग्य, नेटक्या शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.
- 'आपला विश्वासू' 'आपला कृपाभिलाषी' या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.


नमुना (कौटुंबिक)
तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्यदिनाची हकिकत आईला पत्र लिहून कळवा -

                                                                                                                 यज्ञेश राजेश कोलते
                                                                                                                 बाल शिवाजी विद्यालय,
                                                                                                                  राउत वाडी, उत्सव कार्यालय,
                                                                                                                  जिल्हा - अकोला
                                                                                                                  दि. २-२-२०१५

प्रिय आईस,
शिरसाष्टांग नमस्कार,

तुझे पत्र मिळाले. आता मी या शाळेत चांगलाच रुळलो आहे. मला आता ही शाळा खूप आवडू लागली आहे.
नुकताच पंधरा ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा झाला. गेल्याच आठवड्यात स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने काही स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील 'समर-गीत' गायन स्पर्धेत मी 'जिंकू किंवा मारू' हे गीत म्हटले. मला तिसरे बक्षीस मिळाले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी या स्वतंत्र देशासाठी विद्यार्थी काय करू शकतील, याचे उत्तम मार्गदर्शन केले. सामुहिक समर-गीत गायन खूप छान झाले. पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमच खूप छान झाला.
चिरंजीव रियाचा अभ्यास कसा चालला आहे?
ती. बाबांना शि.सा. नमस्कार. चि. रियाला अनेक आशीर्वाद.

                                                                                                                          तुझा,
                                                                                                                           राजू



नमुना (व्यावसायिक)शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्ट तयारी करून घेतली, म्हणून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने लिहा.

                                                                                                                          राजेश कोलते
                                                                                                                          खेडकर नगर,
                                                                                                                          गणपती मंदिराजवळ
                                                                                                                          जिल्हा - अकोला
                                                                                                                          दि. २-२-२०१५
माननीय मुख्याध्यापक,
मुक्ताई माध्यमिक प्रशाला,
आळंदी (देवाची), पुणे - ४१२ १०५

विषय :
परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
महोदय,
सादर प्रणाम.

परवा १८ फेब्रुवारीला आमची सातवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा झाली. आपल्या शाळेतून आम्ही वीस विद्यार्थी बसलो आहोत. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी हे पत्र लिहीत आहे.
सर, आम्हांला सर्वांना पेपर्स अतिशय चांगले गेले. आम्ही दिलेल्या वेळांत सर्व प्रश्न सोडवू शकलो. याचे श्रेय आम्हांला शिकवणाऱ्या गुरुजनांकडे जाते. श्री. देसाई सर, श्री. महाले सर व सौ. नाचणेबाईंनी आमची खूपच चांगली तयारी करून घेतली होती. त्याबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. आपले आभार मानून पत्र पूर्ण करतो.
तसदीबद्दल क्षमस्व.

                                                                                                                          आपला नम्र विद्यार्थी,
                                                                                                                               राजेश कोलते

बुधवार, १३ ऑगस्ट, २०१४

गोकुळष्टमी

या दिवशी मध्यरात्री कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. सर्व दिवस उपोषण करतात. सर्व रात्र भजनात व उत्सवात घालवून दुसरे दिवशी दही, दूध आणि पोहे यांचा काला करतात. उंच दहीहंडी टांगतात आणि एकमेकांच्या खांद्यावर चढून ती हंडी फोडतात.

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

पर्यावरण दिन

आपल्या सभोवार जे जे काही दिसते ते ते सर्व म्हणजे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे निसर्ग. हवा, पाणी, हवेतील विविध वायू, सर्व सजीव व निर्जीव गोष्टी म्हणजे-नद्या, आकाश, डोंगर, वृक्ष, जंगल, सागर, वनस्पती, पाणी, हवा या सर्व गोष्टींचे आपल्या आजूबाजूला जे आवरण आहे तेच पर्यावरण होय. निसर्गातील या सर्वच गोष्टी मानवोपयोगी व मन प्रसन्न करून टाकणाऱ्या आहेत. पण स्वतःच्या सुखासाठी निसर्गावर मात करण्याच्या इच्छेने मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवला. यामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ लागला. औद्योगिकीकरण व जंगलतोड यामुळे हवामानात बदल झाला. जमिनीची धूप वाढली. कस कमी झाला. रासायनिक कीटकनाशकांमुळे विषारी द्रव्यांचा परिणाम जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर होऊ लागला. कारखान्यातील दूषित पाणी, कचरा नद्यांत सोडल्यामुळे  पाणवनस्पती, मासे नष्ट होऊन जलप्रदूषण वाढले. कारखान्यांच्या, वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढले. रस्ते, घरे बांधण्यासाठी डोंगर व झाडांचा नायनाट होऊ लागला. गाड्यांचे आवाज, हॉर्न, यंत्राचे आवाज, नगारे, लाऊडस्पीकर, रेडिओ, टी.व्ही. यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषण होऊन शारीरिक आजार होऊ लागले. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे यांच्यामुळे प्रचंड कचरानिर्मिती होऊन दुर्गंधी व रोगराई निर्माण होऊ लागली. म्हणजेच माणसाने स्वतःच स्वतःला धोकादायक परिस्थिती निर्माण करून विनाशाकडे वाटचाल चालविली आहे. दूषित हवा, दूषित अन्नपदार्थ यामुळे माणसे व्याधीग्रस्त होत चालली आहेत. दूषित वायूमुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या संरक्षणात्मक कवचाला धोका निर्माण होऊन त्यातून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचा व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. अमाप जंगल, वृक्षतोडीमुळे शुद्ध हवा, पाऊसपाणी, अन्नधान्ये यांची टंचाई निर्माण झाली आहे. हा सर्व -हास थांबविण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी व ते स्वच्छ, समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न  करायला हवा. पर्यावरणाच्या गभीर समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता दरवर्षी ५ जून हा पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्यासाठी वृक्ष लावून वाढवावेत. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. 'कचरा' कचराकुंडीतच टाकावा. स्वयंपाकासाठी गॅस, बायोगॅसचा वापर करावा. पाणी वाया घालवू नये. रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांसारख्या संपुष्टात येणाऱ्या खनिज तेलाचा काटकसरीने वापर करावा. गिरण्यांची धुराडी उंच ठेवावी. रासायनिक खते, कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर व्हावा. होळीसाठी वृक्षतोड न करता कचऱ्याची व दुर्गुणांची होळी करावी. दिवाळीला निर्धूर व आवाजरहित फटाके वापरावेत. जत्रेवेळी, नागपंचमीला प्राणीहत्या व सर्पहत्या करू नये. वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे.
पुण्याचे सुप्रसिद्ध समाजसेवक मोहन धारिया यांनी 'वनराई' संस्था स्थापन करून पर्यावरण संरक्षण - महत्त्व पटवून दिले. राळेगणसिद्धीच्या अण्णा हजारे यांनीसुद्धा पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले आहेत. आपणही शिबिरे, सहली, वृक्षदिंडी, घोषवाक्ये, स्लाईड शो, पथनाट्ये, व्याख्याने याव्दारे जागृती केली पाहिजे.

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

झाशीची राणी लक्ष्मीबाई (मनू)

इंग्रजांविरुद्ध भडकलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी 'मेरी झाँसी नही दूँगी' अशी गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचा जन्म कार्तिक वद्य चतुर्दशी, १९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. तिच्या आईचे नाव होते भागिरथीबाई, वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांच्या दरबारी एक कर्तबगार अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव होते मनकर्णिका. पण घरची मंडळी तिला मनू म्हणूनच हाक मारत.
मनू चार वर्षांची असतानाच तिची आई निवर्तली. वडिलांच्या तालमीत तिचे शिक्षण झाले. ती मुलगी असूनही अत्यंत धाडसी, निर्भय आणि अत्यंत बुद्धिमान होती. मर्दानी पुरुषी खेळांच्या गोडीमुळे तिने तलवार, भालाफेक, धनुष्यबाण, घोड्यावर बसणे इत्यादींचे शिक्षण समरसतेने घेतले होते.
एके दिवशी नानासाहेब पेशवे हत्तीवरून फिरावयास निघाले होते तेव्हा मनूनेही बसण्याचा हट्ट केला. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, ''बाळ मानू, तुझ्या नशिबात हत्ती कुठला? हत्तीवरून फिरण्याची तुझी योग्यता तरी आहे का?'' हे ऐकताच मनू म्हणाली, ''बाबा, तुमच्या मुलीच्या घरी एकच काय, दहा हत्ती पोसलेले दिसतील तुम्हाला!" मनूचे हे सहज बोलणे खरे ठरले. पुढे झाशी संस्थानचे महाराज गंगाधर यांच्याशी विवाह होऊन ती त्यांची लक्ष्मीबाई झाली.
झाशीला आल्यावर लक्ष्मीबाईने आपल्या मैत्रिणींनाही मल्लयुध्द, घोडदौड, ढाल तलवार इत्यादी युद्धकला शिक्षण दिले. १८५१ मध्ये राणीसाहेबांना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने अवघ्या तीन महिन्यांत मरण पावला. त्यामुळे तिने दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला. नंतर गंगाधरपंतही मृत्यू पावले. या प्रचंड दुःखाला सामोरे जात अत्यंत सध्या राहणीने, सावधपणे राज्यकारभार करीत प्रजेच्या हिताच्या सोयी राणीने केल्या.
याचवेळी कुटील नीतीच्या इंग्रजांनी, लॉर्ड डलहौसीने 'दत्तक वारस नामंजूर' करून झाशीचे संस्थान खालसा केले व राणीला पाच हजार रुपयांची पेन्शन जाहीर केली. तेव्हा मात्र राणीने गर्जना केली, 'मेरी झाशी नही दूँगी!' राणीने क्रांतिकारकांच्या मदतीने झाशीचे स्वातंत्र्य टिकविण्याची पराकाष्ठा केली.
शेवटी इंग्रजांचा कुशल सेनापती हा रोज याने आपल्या प्रचंड सैन्यानिशी चाल केली. राणीनेही आपल्या ५१ तोफानिशी बुंदेलखंडी सैनिक, पठाण सैनिक व आपल्या स्त्री सैनिकांसह स्वातंत्र्ययुध्द चालू ठेवले होते. किल्ल्याचे ढासळलेले बुरूज व खिंडारे रातोरात बांधले जात असत. पण ऐनवेळी राणीला मिळणारी तात्या टोपेची मदत इंग्रजांनी रोखून धरली. काही देशद्रोह्यामुळे इंग्रज सैनिक झाशीच्या किल्ल्यात घुसले तेव्हा महिषासुर मादिंनीप्रमाणे राणी शत्रूवर तुटून पडली. झाशीच्या वेढ्यातून धाडसाने बाहेर पडून ती काल्पीला पोहोचली. तेथेही तुंबळ युध्द होऊन ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत करण्यात आला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
इकडे हा रोज, ब्रिगेडियर स्मिथ व स्टुअर्ट यांनी तुफान गोळीबार सुरू गोळीबार सुरू ठेवून राणीशी युध्द सुरू ठेवले. आपला शेवट जवळ आला हे कळून राणीने आपला पुत्र दामोदर याला रामचंद्र देशमुखांच्या स्वाधीन केले व आपला धोडा भरधाव सोडला. पण शत्रूच्या गोळीने डाव साधला होता. वीर व साहसी लक्ष्मीबाईचे देशासाठी बलिदान झाले तो दिवस होता १८ जून १८५८.