Advertisement

मंगळवार, २४ मार्च, २०१५

संधी, Sandhī

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.