Advertisement

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

झुकझुक झुकझुक आगीन गाडी zukzuk zukzuk aagin gadi

झुकझुक झुकझुक आगीन गाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊयाऽऽ जाऊयाऽऽ II१II
मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊ या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II२II
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली चोरटी, भाच्यांची नावे सांगू या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II३II
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण, गुलाब जाम खाऊया
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II४II
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार, कोट विजारी घेऊ या
मामाच्या गावाला जाऊ याऽऽ जाऊ याऽऽ II५II

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

मदर तेरेसा

गरिबांची आई
१९७९ साल. मदर तेरेसांना त्या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. या प्रतिष्ठित पुरस्काराचा स्वीकार करायला मदर तेरेसा विनम्र वृत्तीने गेल्या. जगात शांतता प्रस्थापित करण्याचा मानवतेची सेवा हाच राजमार्ग असतो. मदर तेरेसांनी हे सिद्ध केले होते, त्यामुळे त्यांची निवड निर्विवाद आणि पारितोषिकाचीच शान वाढवणारी ठरली; कारण गेल्या काही वर्षांत हा बहुमान मिळालेल्या व्यक्तींमध्ये राजकारणी नेते, पुढारी किंवा मुत्सद्दी होते. सतत ३१ वर्षे कोलकात्याच्या झोपडपट्टयांमध्ये काम करणारी स्त्री नव्हती! मदर तेरेसांमुळे भारतातल्या एकाच शहराचे नाव नोबेल पुरस्कारसाठी दुसऱ्यांदा जोडले गेले. देशोदेशीचे उच्च पदाधिकारी, मुत्सद्दी, विचारवंत यांच्या उपस्थितीत एका लहानखुऱ्या, कृश, खादीधाऱ्या मदरनी, जेव्हा एक लाख नव्वद हजार डॉलर्सचा तो पुरस्कार स्वीकारला, तेव्हा खूप वेळ टाळ्यांचा गगनभेदी कडकडात होत राहिला!
त्यानंतर मदर तेरेसा बोलायला लागल्या. एक स्मितवदन आणि काळजाला हात घालणारे साधेसे भाषण. त्या भाषणामागे आयुष्यभराची साधना होती. ते विद्वत्ताप्रचुर नव्हते; पण भावनांनी ओतप्रोत होते. सुमारे वीस मिनिटे चाललेच्या आभाराच्या भाषणाचा प्रारंभ मदरनी प्रार्थनेने केला. बोलताना त्या कितीदा गहिवरल्या. श्रोत्यांचे डोळेही ओले झाले.
मदर तेरेसा म्हणाल्या, ''व्यक्तिश: मला असं वाटतं, की मी या पुरस्कारासाठी पात्र नाही; पण माझ्या गरीब बांधवांच्या वतीनं मी त्याचा स्वीकार करते. मला हा पुरस्कार देऊन नोबेल कमिटीनं एक प्रकारे गरीब देशांचाच गौरव केला आहे. जगातल्या गरिबांना मान्यता मिळाली आहे." "आपण या जगात प्रेम करायला आलो आहोत. एक वेळ पोटाची भूक भागवता येईल; पण प्रेमाची भूक भागणं फार कठीण. आपल्या कुटुंबातच अशी एखादी व्यक्ती असेल, जी प्रेमाची भुकेली असेल, तिला प्रेम द्या. घरातून सुरू झालेलं प्रेम जगभर पसरू शकेल."
शांतता तरी का नष्ट होते? माणसाच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणून आज जगभरात लाखो मुलं मरताहेत. भूक, दैन्य अशा अनेक कारणांनी. मला माझ्या गरीब आणि अनाथबांधवांनी अमाप प्रेम दिलं आहे. तुम्हीही तुमच्या देशापासून सुरुवात करा. गरीब शोधा आणि प्रेम करायला लागा. तुम्ही कधी भूक जवळून पाहिली आहे की नाही मला माहीत नाही. मी ती पाहिली आहे. भूक शरीरावर, डोळ्यांतून फार दारुण तऱ्हेने व्यक्त होते. अशांच्या तोंडी एक घास घातला, तरी ते लोक जन्मभर पुरेल इतकं प्रेम मला देतात. हे माझं केवढ भाग्य! छोटस हसू. मनापासून आलेलं. ती प्रेमाची सुरुवात असते. या हसण्यानं आपण स्वत:च आणि दुसऱ्याच आयुष सुखी करू शकतो. कुटुंबातसुद्धा एकमेकांना अस प्रेमाच हसू द्या. जीवन सुंदर होऊन जाईल. नोबेल प्राईझ ही नॉर्वेजियन लोकांनी मला दिलेली सुंदर भेट आहे. या रकमेतूनमी घर नसलेल्या लोकांसाठी घर बांधून घेणार आहे. प्रेम घरापासूनच सुरू होतं अशी माझी श्रद्धा आहे. घरच नसेल, तर प्रेम कुठून येणार? म्हणूनच गरिबांना घर द्यायची." जगभर केवळ गरीब देशातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशामध्येही मला दूर करायला अतिशय अवघड अशी गरिबी आढळली. रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी भिकाऱ्याला उचलून आणून मी त्याला बशीभर भात देते, तेव्हा त्याची भूक मिटते; पण जी व्यक्ती नकोशी आहे, एकटी आहे. समाजानं जिला टाकून दिलेल आहे, त्या व्यक्तीची गरिबी फार क्लेशकारक आहे.
मदर तेरेसांचे भाषण संपले, तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारात बुडून गेली होती. मदरनी नोबेल कमिटीला असे आवाहन केले, की वितरण सोहळ्यानंतरची रद्द करावी. त्या वाचलेल्या पैशांतून गरिबांना जेवण द्यावे. या विनंतीने सर्वांच्या हृदयांना उदात्ततेचा स्पर्श झाला. भावनांचा एकच कल्लोळ उमटला. नॉर्वे, स्वीडन, युरोपमधल्या सामान्य माणसांनी पैसे दिले. लहान मुलांनी आपला पॉकेटमनी दिला. बघता बघता ३६ हजार पौंड जमले. मेजवानीचे जे पैसे वाचले होते, ते तीन हजार पौंड त्यात घातल्यावर ती रक्कम नोबेल पारितोषिकाच्या रकमेच्या जवळ जवळ निम्मी झाली. अनेक देशांना त्यांच्यावर चित्रपट करायचे होते. जपानी टेलिव्हिजनचे एक पथक आले होते. मदर त्यांना म्हणाल्या, "नो सॉरी. आता पुरे झालं ते. नो मोअर ग्लॅमर अॅण्ड पब्लिसिटी. मला माझ्या सेवेच्या साध्या आयुष्याकडे परत वळू द्या. आपले खरे काम कोणते हे एकदा पक्के झाले, की त्या खऱ्या कामापासून दूर नेणारे काहीही अशा थोर व्यक्तींना आवडत नसंते. मग ती कीर्ती असो, की पैसा.

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

मायबोली

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 

आमुच्या मनामनांत दंगते मराठी                  
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी                 
 आमुच्या नसानसांत नाचते मराठी                 
 आमुच्या रगारगांत रंगते मराठी
 

आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
आमुच्या मुलामुलींत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी
                  

आमुच्या कुलाकुलांत नांदते मराठी                 
येथल्या फुलागुलांत हासते मराठी                 
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी                 
येथल्या नगनगांत गर्जते मराठी
 

येथल्या दरीदरींत हिंडते मराठी
येथल्या वनवानांत गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळींत लाजते मराठी
                 

 येथल्या नभामधून वर्षते मराठी                  
येथल्या पिकामधून डोलते मराठी                  
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी                  
येथल्या चराचरांत राहते मराठी

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

डॉ. राधाकृष्णन् तत्त्वज्ञानात निपुण होते. ते फार विव्दान होते. इंग्रजी भाषेवर त्यांचा प्रभुत्व होतं. तत्त्वज्ञान हा विषय तसा शुष्क आहे; परंतु ते आपल्या प्रभावी इंग्रजी भाषणानं करून सांगत. ऐकणाऱ्याला असं वाटे की ह्या व्यक्तीनं इंग्लंडच्या  ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विश्वविद्यायलात शिक्षण घेतलंय. डॉ. राधाकृष्णन काही शिकण्यासाठी कधीही परदेशात गेले नाही; परंतु त्यांनी राजनीती, शासन, शिक्षण आणि आध्यात्मिक क्षेत्रांव्दारे केवळ भारतातच नव्हे; तर साऱ्या जगाला प्रभावित केलं. डॉ. राधाकृष्णन् याचं खरं गाव 'सर्वपल्ली' हे होतं; परंतु त्यांच्या यापूर्वीच्या दोन पिढ्या तिरुतणी गावाला गेल्या. नंतर ते मद्रासचे निवासी झाले. त्यांचे वडील पौरोहीत्याबरोबरच शिक्षकाचंही कार्य करत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ ला झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत हे आपल्या गावातच राहिले. त्यांच्या वडिलांनीच त्यांना प्राथमिक शिक्षण दिलं. नंतर एफ. ए. र्यंतच शिक्षण वेल्लोर येथे घेतल. नंतर मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकले. डॉ. राधाकृष्णन् याचं कुटुंब फार गरीब किंवा फार श्रीमंत नव्हतं; परंतु कॉलेजच शिक्षण घेणं कठीण होतं. त्यांसाठी तरुण राधाकृष्णन् ट्युशन्स घ्याव्या लागत. शिक्षणानंतर ते १९०८ मध्ये मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले.
डॉ. राधाकृष्णन् यांनी १९१७ पर्यंत मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. ह्याच काळात त्यांनी अनेक भाषणं दिली. अनेक देशी-विदेशी वृत्तपत्रांमध्ये विव्द्त्तापूर्ण लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांची व्याप्ती देश-विदेशात पसरू लागली. त्या दिवसांमध्ये म्हैसूर संस्थानात एक व्यक्ती दिवण होती. भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांशी तिची घनिष्ठ ओळख होती. ह्याशिवाय ती व्यक्ती परदेशातही आपल्या योग्यतेमुळे प्रसिध्द होती. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर विश्वेश्वरैया. जेव्हा त्यांनी साऱ्या भारतातून विव्दान वक्ती निवडून, पारखून एकत्र केल्या, त्यात राधाकृष्णनही होते. डॉ. राधाकृष्णन् यांची म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली. डॉ. राधाकृष्णन् यांनी पीएच.डी. केलेली नव्हती. ह्याचं कारण कदाचित गरिबी असू शकेल. पण पुढे जगभरातील सगळ्या प्रमुख विद्याकृष्णनना सन्मान आणि प्रेम दिलं. म्हैसूरमध्ये त्यांना तीन वर्षे राहता आलं. नंतर ते कलकत्त्याला जाण्यास निघाले तेव्हा म्हैसूरच्या रस्त्यांवर एक अनोखं दृश्य दिसलं, विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय अध्यापकाला गाडीत बसवलं आणि हातानं ती ओढत रेल्वेस्टेशनपर्यंत नेलं. म्हैसूरच्या डॉ. विश्वेश्वरैयांप्रमाणेच कलकत्त्यात आशुतोष मुखर्जी होते, त्या दिवसात कलकत्ता म्हणजे विद्या, कला आणि व्यवसायाचं केंद्र होतं, सर मुखर्जी कलकत्ता युनिव्हर्सिटिक प्राण होते. त्यांनी डॉ. राधाकृष्णन् यांची पोस्ट ग्रॅज्युएट विभागात तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली. त्या दिवसांमध्ये कलकत्ता विद्यापीठ फार श्रेष्ठ विद्यापीठ मानलं जाई. आंध्र विद्यापीठाची स्थापन १९२६ मध्ये झाले. तेथील सिनेट राधाकृष्णन् कुलपती बनवण्याचा विचार करत होती. त्यांना आंध्रमध्ये आणण्यात तिला यश मिळालं. १९३१ मध्ये राधाकृष्णन् यांनी आपला नवीन कार्यभार सांभाळला. तिथे त्यांनी प्रयोगशाळा, विद्यार्थी-निवास, पुस्तकालय, विद्यालयभवन काही काळातच उभारले. डॉ. राधाकृष्णन् १९१८ मध्ये सेवाग्राम येथे गांधीजींना भेटले. ह्याआधी ते गांधीजींच्या संपर्कात आले होते. सेवाग्राममध्ये राधाकृष्णन् यांना अभिनंदन ग्रंथ भेट देण्याची योजना आखली. नंतर ती भेट त्यांना देण्यात आली.
डॉ. राधाकृष्णन् यांना नेहमीच 'शिक्षक' म्हटलं गेलंय; परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रात ४० वर्षे घालवली. त्यांनी शिक्षण, लेखन, व्यवस्था, राजनीती आणि शासन ह्या सगळ्याच क्षेत्रात कार्य केलेलं आहे. शिक्षकापासून ते शिक्षण संस्थाचे व्यवस्थापक, कुलपती म्हणून त्यांनी काम केल. शिक्षकाच्या रूपात त्याचं योगदान फार मोठ आहे. तसे कलकत्त्याला ते क्वचितच प्रोफेसर होते. ऑक्सफर्डमध्ये ते प्रोफेसर होते. क्वचितच एखादी व्यक्ती दोन देशांमध्ये प्रोफेसर राहिली असेल. रशियात राजदूत राहूनही ते लंडनला अध्यापनासाठी जात होते. त्यांना कोणाच्या शिफारशीची गरज नव्हती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. शिक्षणमंत्री होते अबुल कलम आझाद. त्यांनी भारतात शिक्षणाच्या नवीन व्यवस्थेकरिता एका आयोगाची नियुक्ती केली. राधाकृष्णन् ह्या आयोगाचे अध्यक्ष होते. शिक्षण शास्त्रज्ञाचा रूपात त्यांनी कित्येक राष्ट्रीय एशियेटिक, तसंच आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्येअध्यक्षपद भूषविलं, काशीत पाहिलं आशियाई संमेलन भरलं. त्याचेही ते अध्यक्ष होते. १९३७-३८ मध्ये लखनौ येथे दुसरं अधिवेशन झालं, त्याचेही ते अध्यक्ष राहिले. डॉ. राधाकृष्णन् यांनी आंतरराष्ट्रीय बौध्दिक सहयोग, विश्वशांती आणि विश्वबंधुत्वासाठी फार मोठं कार्य केलं. युनेस्कोच अधिवेशन त्यांच्याच प्रयत्नांनामुळे दिल्लीत झालं.
मास्को येथून राजदूत म्हणून काम केल्यावर ते जेव्हा १९५२ मध्ये भारतास येण्यास निघाले तेव्हा रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ''आपण पहिली व्यक्ती आहात, जिनं मला मानव समजून माझ्याशी व्यवहार केला.'' राज्यसभेत तेव्हा कॉंग्रेसचं बहुमत होतं. डॉ. राधाकृष्णन् त्यावेळी निर्विरोध भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. उपराष्ट्रपती होण्याबरोबरच ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती आणि साहित्य अॅकेडेमीचे उपाध्यक्षही झाले. १९६१ मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निधनानंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले, पण त्यांनी राष्ट्रपतीपदाचं वेतन घेतलं नाही, पोषाख पूर्वीचाच ठेवला. त्यांच्या एकेक अफाट कार्यामुळेच त्यांना 'भारत-रत्न' हा सन्मान मिळाला. डॉ. राधाकृष्णन् यांना १७ एप्रिल १९७५ ला देवाज्ञा झाली.

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

वर्ण

आपण बोलतो म्हणजे एकामागून एक असे विचार मांडतो. प्रत्येक पुऱ्या पुर्थाच्या विचाराला 'वाक्य' असे म्हणतात. 'मुले अभ्यास करतात' हे एक वाक्य आहे. या वाक्यात तीन शब्द आहेत. 'मुले' हा एक शब्द आहे. या शब्दात 'मु' व 'ले' अशी दोन अक्षरे आहेत. अक्षर म्हणजे आमच्या आवाजाच्या खुणा होत. त्यांना 'ध्वनिचिन्हे' असेही म्हणतात. 'मु' हा एक ध्वनी असला तरी तो मूलध्वनी नव्हे. त्यात 'म्' व 'उ' असे दोन मूलध्वनी आहेत. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या अशा मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.
'अ, आ, इ, ई...... पासून ह्, ळ्' पर्यंत असे एकूण ४८ वर्ण मराठीत मानतात. वर्णांच्या या मालिकेला 'वर्णमाला' किंवा 'मुळाक्षरे' म्हणतात.

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

संधी विग्रह

अद्ययावत् (अद्य + यावत्)
अनसूया (अन् + असूया)
अभीष्ट (अभि + इष्ट)
अत्युत्तम (अति + उत्तम)
अत्यल्प (अति + अल्प)
अत्याचार (अति + आचार)
अन्वर्थ (अनु + अर्थ)
इयत्ता (इयत् + इतके + ता)
ईश्वरेच्छा (ईश्वर + इच्छा)
उज्ज्वल (उत् + ज्वल)
उष्ण (उष + न)
एकैक (एक + एक)
कवीश्वर (कवि + ईश्वर)
कवीच्छा (कवि + इच्छा)
कोट्यधीश (कोटि + अधीश)
कित्येक (किती + एक)
गणेश (गण + ईश)
गंगोदक (गंगा + उदक)
गांगोर्मी (गंगा + ऊर्मी)
गंगौघ (गंगा + ओघ)
गिरीश (गिरि + ईश)
गुरुपदेश (गुरू + उपदेश)
गुर्वैश्वर्य (गुरू + ऐश्वर्य)
तत्त्व (तत् + त्व)
चतुरस्र (चतुर + अस्र)
देवर्षी (देव ॠषी)
देव्यैश्वर्य (देवी + ऐश्वर्य)
धारोष्ण (धारा + उष्ण)
जलौघ (जल + ओघ)
जलोर्मी (जल + ऊर्मी)
जनैक्य (जन + ऐक्य)
त्र्यंबक (त्रि + अंबक + डोळे)
नयन (ने + अन)
नद्योघ (नदी + ओघ)
गवीश्वर (गो + ईश्वर)
गायन (गै + अन)
नाविक (नौ + इक)
गोलाकार (गोल + आकार)
गोमतीच्छा (गोमती + इच्छा)
निर्भर्त्सना (निर् + भर्त्स् + अन)
निसर्गोपचार (निसर्ग + उपचार)
नैॠत्य (नैॠति + य)
परीक्षा (परि + ईशा) इ+ई+ई
पार्वत्तीश (पार्वती + ईश)
प्रतीक्षा (प्रति + ईक्षा) इ+ई+ई
प्रजैक्य (प्रजा + ऐक्य)
प्रीत्यर्थ (प्रीति + अर्थ)
प्रित्राज्ञा (पितृ + आज्ञा)
पित्रर्थ (पितृ + अर्थ)
बालौत्सुक्य (बाल + औचित्य)
ब्रह्यर्षी (ब्रह्य + ॠषी)
भान्वीश्वर (भानू + ईश्वर)
भानूद्य (भानु + उत्कर्ष)
भ्रात्रिच्छा (भ्रातृ + इच्छा)
भूद्धार (भू + उद्धार)
भूर्जा (भू + ऊर्जा)
महर्षी (महा + ॠषी)
महेंद्र (महा + इंद्र)
मथितार्थ (मथित + घुसळलेला + अर्थ)
महत्तम (महत् + तम)
महीश (मही + ईश)
महौदार्य (महा + औदार्य)
मातृण (मातृ + ॠण)
मतैक्य (मत + ऐक्य)
महर्षी (महा + ॠषी)
मन्वंतर (मनु + अंतर)
मध्वोज (मधु + ओज)
यथेष्ट (यथा + इष्ट)
यामुनौघ (यमुना + ओघ)
यव्दिन्द्र (यदु + इन्द्र)
रमेश (रमा + ईश)
रवींद्र (रवि + इंद्र) इ+इ+ई
रंभोरू (रंभा + ऊरू)
राजाज्ञा (राजा + आज्ञा)
रामेश्वर (राम + ईश्वर)
लघुतम (लघु + तम)
लोकेच्छा (लोक + इच्छा)
वधूत्कर्ष (वधू + उत्कर्ष)
वाङ्.मय (वाक् + मय) क् + म ङ्.म
विध्यर्थ (विधि + अर्थ)
विद्यार्थी (विद्या + अर्थी)
विद्यालय (विद्या + आलय)
विद्यामृत (विद्या + अमृत)
विद्यैश्वर्य (विद्या + ऐश्वर्य)
वृक्षौदार्य (वृक्ष + औदार्य)
शरच्चंद्र = शरद् + चंद्र (शरत् + चंद्र)
समुद्रोर्मी (समुद्र + ऊर्मी)
सदैव (सदा + एव)
सुशीला (सु + शीला)
सुज्ञ (सुज्ञ + ज्ञ = जाणणारा)
सूर्यास्त (सूर्य + अस्त)
सूर्योदय (सूर्य + उदय)
स्वल्प (सु + अल्प)
हत्या (हत् + या)
हेत्वाभास (हेतु + आभास)
हिमालय (हिम + आलय)
क्षणैक (क्षण + एक)
क्षमौचित्य (क्षमा + औचित्य)

शुद्धलेखन म्हणजे काय?

आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला म्हणतात 'लेखन'. आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही. आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो. शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.
आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते. जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते. आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.
शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो. तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी)   यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.
आधी भाषा, मग व्यकरण : 'शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे. पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे. याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते. आता आपण तसा उच्चार कलारत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत. पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे. प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते. भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो. लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल. एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो. पूर्वी अनुस्वार तहेने हे 'शुद्ध' समजले जाई. आज त्यांतले बरेच अनूस्वर कमी झाले आहेत. पूर्वीचे जे 'शुद्ध' होते ते 'अशुद्ध' झाले असा त्याचा अर्थ नव्हे. पूर्वी बोलण्याची तशी पद्धत होती; त्या वेळी तसे लिहिणे शुध्द म्हणजे शिष्टमान्य व व्याकारनासंमत मानले जात असे. म्हणजे त्या वेळच्या सुविद्य व सुसंस्कृत व्यक्तींना मान्य असलेले व व्याकरणाच्या नियमांस वनुसरून केलेले असेच ते लेखन असे. आज आपली लेखनपद्धती बदलली; त्यामुळे आजच्या लेखनविषयक नियमांत बदल करावा लागला म्हणून या नियमांना 'शुद्धलेखनाचे नियम' असे न म्हणता 'लेखनविषयक नियम' म्हणणे अधिक समर्पक होईल. काहींनी या शुद्धलेखन-विचारला 'लेखनशुद्धी', 'लेखननियाम', 'लेखनपद्धती' अशी विविध नावे सुचविली आहेत. पण शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ या न्यायाने लेखनातील शुध्दस्वरूपविषयक चर्चेला आपण आजवर 'शुद्धलेखन' असेच संबोधित आलो आहोत. सोय म्हणून आपण तोच शब्द वापरू. पण त्याचा खरा अर्थ 'लेखनविषयक आजचे नियम' असा आहे, हे विसरता कामा नये. आजचे हे नियम पुढे असेच राहतील असे नाही. कालांतराने त्यात बदल होणे शक्य आहे. त्या त्या वेळच्या लेखनविषयक, शिष्टमान्य व व्याकरणसंमत नियमांना अनुसरून लेखन करणे याचे नाव 'शुद्धलेखन.'

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

गोपाळ कृष्ण गोखले

महात्मा गांधीजींचे राजकारणातील गुरू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते, ते भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले होते. बालपणापासूनच जे काम समोर असेल ते तादात्म्याने करायचे, असा गोपाळरावांचा स्वभाव होता. त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. स्मरणशक्तीसारख्या गुणाला त्यांनी अभ्यासाने पराकाष्ठेला पोहोचवले होते. सुरुवातीस त्यांनी इंग्रजी भाषेचे अध्यापन केले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणण्याचे काम गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले.
गोपाळ कृष्ण गोखले यांना राजकारणाची स्वयंभू अभिरुची होती व ह्यादृष्टीने राजकारणाचे अध्ययन करीत. त्या अध्ययनाला निश्चित दिशा देण्याचे कार्य हे न्या. महादेव गोविंद रानडे यांनी केले. पुढे 'सार्वजनिक सभेचे' ते चिटणीस झाले. ह्या सभेच्या त्रैमासिकात त्यांनी खूप लेख लिहिले. इ.स. १८९७ साली ते इंग्लंडला गेले. तेथे वेल्बी कमिशनसमोर त्यांनी भाषण केले. राज्यकारभारात मोठ्या पगाराच्या सर्व जागांवर गोऱ्यांची नेमणूक होते, ही हिंदी पुढाऱ्यांच्या मनात सलणारी बाब त्यांनी मोलेंसाहेबांशी चर्चा केली. त्यानंतर ते भारतात परत आले.
तरुण होतकरू माणसे घेऊन त्यांना देशसेवेला लावायचे ही गोपाळरावांची आकांक्षा होती. तरुण आस्थेवाईक देशासेवाकांची संस्था म्हणून त्यांनी या संस्थेत ''सर्व्हट्स ऑफ इंडिया'' हे नाव दिले. मराठी 'भारत सेवक समाज' या नावाने ती संस्था ओळखली जाऊ लागली. देशसेवेची जी शाखा ज्याला रुचेल, झेपेल त्यांनी तिला आमरण वाहून घ्यावे, असा या संस्थेचा उद्देश होता.
"सार्वजनिक जीवन हाच धर्म. देशप्रेम असे असावे की, त्यापुढे इतर कशाचीच मातब्बरी वाटू नये. उलट देशभक्ताला स्वार्थत्यागाचा प्रत्येक प्रसंग हा मंगल समारंभासारखा आनंदाचा वाटला पाहिजे संकटाची मात्रा चालू न देणारे पाहिजे."असे ते म्हणत.
महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानीत. 'राजकीय क्षेत्रात गोपाळराव पूर्ण पुरुष होते,' असे गांधीजींनी त्यांच्याबद्दल उद्गार काढले आहेत. गांधीजी त्यांना 'महात्मा', 'धर्मात्मा' असे संबोधीत. सत्य आणि न्याय या तत्वासाठी चाललेल्या गांधीजींच्या सत्याग्रहात गोपाळ कृष्ण गोखले यांनी बरीच मदत केली होती.
आपल्या जीवनात त्यांनी हिंदी राजकरणाचा अभ्यास केला, तसेच इंग्रजी राजकारणातले दोषही दाखविले. आपल्याजवळ उपजत असेलल्या कुशाग्र बुद्धीला पाठांतराने त्यांनी भर चढविला. कीर्ती, लोकप्रियता यांच्यामागे ते कधी धावले नाहीत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काम पाहताना, जरुरीपुरतेच वेतन ते घेत असत. निःस्पृहतेचा आदर्श त्यांनी निर्माण केला जातो. गोपाळरावांच्या निःस्वार्थ देशभक्तीचा गुण लक्षात घेऊन इंग्रज सरकारने त्यांना 'सर' हा किताब देणाऱ्या देऊ केला होता. पण तो त्यांनी नाकारला. पण तो किताब दिल्याबद्दल बादशहा भारतमंत्री, आणि व्हाइसराँयबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशहितार्थ वाटेल ते कष्ट पेलण्याची व त्रास सोसण्याची तयारी हा त्यांचा स्वाभवविशेष होता. कोणतेही स्वीकारलेले काम हे निर्दोष व परिपूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असे. कमालीचा साधेपणा, सत्याचे प्राणातिक प्रेम, विनय, मार्दव हे त्यांचे सद्गुण होते. देशाच्या उध्दाराच्या तळमळीने ते झपाटलेले असत. देशाच्या उत्कर्षचा विचार व आचार यात त्यांना आनंद वाटत असे.
गोपाळरावांनी स्वतःकरिता देशभक्तीची भूमिका निवडली व ती आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत निभावली. या भूमिकेला माणुसकीचे अधिष्ठान होते. राजकारणाला अध्यात्माचे रूप द्दावे, हा त्यांचा सिद्धान्त प्रसिद्ध आहे. ते खऱ्या अर्थाने  'भारतसेवक' होते.
बोधवाक्य - "सार्वजनिक जीवन हाच धर्म. देशप्रेम असे असावे की, त्यापुढे इतर कशाचीच मातब्बरी वाटू नये."