Advertisement

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

Republic day, प्रजासत्ताक दिन

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतीय सन-उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रभागी आहे. वेगवेगळ्या धर्माचे सण आम्ही सारख्याच उत्साहाने साजरे करत आहे. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय दिनही आम्ही साजरे करतो. भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या जनतेला घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्या दिवसापासून भारतात प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या समारंभात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रांतील वैभवाचे दर्शन घडवणारी भलीमोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजवणार्र्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो.
शाळेतही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी झेंडे-पताका यांनी शाळा सजवली जाते. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील एन्.सी.सी. व स्काऊटचे विद्यार्थी सुंदर संचालन करतात. शाळेतील वाद्यवृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. आम्ही सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. प्रमुखाध्यापक गुणी विद्याथ्र्यांचे कौतुक करतात. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. प्रजासत्ताक दिन याला गणतन्त्र दिन, गणराज्य, Republic day असे ही म्हणतात.
संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्याचे काम १९४६ साली सुरू केले. संविधान समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गावाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी या सभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नियुक्त केली. स्वतंत्र भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' आहेत. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही या मुल्यावरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या वीरांचे चीज झाले. या दिवशी देशाने राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली. सन १९५० पासून आतापर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा