Advertisement

सोमवार, १६ जून, २०१४

।।पसायदान।।

आतां विश्र्वात्मकें देवें।  येणे वाग्यज्ञें तोषावे।
तोषोनि मज द्यावें।  पसायदान हें।।१।।

जे खळांची व्यंकटी सांडो।  तयां सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परें जडो।  मैत्र जीवांचे।।२।।

दुरितांचे तिमिर जावो।  विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो।  प्राणिजात।।३।।

वर्षत सकळमंगळी।  ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळीं।  भेटतु भूतां।।४।।

चलां कल्पतरूंचे आरव।  चेतना चिंतामणींचे गांव।
बोलते जे अर्णव।  पीयूषांचे।।५।।

चंद्रमें जे अलांछन।  मार्तंड जे तापहीन।
ते सर्वही सदा सज्जन।  सोयरे होतु।।६।।

किंबहुना सर्वसुखीं।  पूर्ण होऊनी तिहीं लोकीं।
भजिजो आदिपुरूखीं।  अखंडित।।७।।

आणि ग्रंथोपजीविये।  विशेषीं लोकीं इये।
दृष्टादृष्टविजयें।  होआवें जी।।८।।

येथ म्हणे श्री विश्वेश रावो।  हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो।  सुखिया जाला।।९।।

भावार्थ
संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण झाल्यावर श्री ज्ञानेश्वर या विश्वरूप देवापाशी म्हणजे आपले गुरू संत निवृत्तीनाथांपाशी हे अखेरचे पसायदान मागत आहेत. हे परमेश्वरा माझ्या या ज्ञानेश्वरीरूपी वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन तू मला असा प्रसाद दे. या पृथ्वीवरील सर्व दुष्टांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्यांना चांगल्या कामाची गोडी लागावी, सर्व प्राणी मात्रांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल स्नेहभाव निर्माण व्हावा.वाईट लोकांच्या मनातील पापरूपी अंधःकार दूर व्हावा, विश्वातील प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्या स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या स्वकर्तव्याची जाणीव व्हावी आणि प्रत्येक प्राणीमात्राची जी जी सदिच्छा आहे ती ती पूर्ण व्हावी. सर्वत्र ईश्वर निष्ठांचे समुदाय निर्माण होवोत आणि सर्वांना सज्जनांचे सान्निध्य सतत लाभत राहो. या पृथ्वीवर चालणाऱ्या कल्पवृक्षांची वने निर्माण व्हावीत. इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणींची नगरे वसवीत आणि अमृताचे बोलके समुद्र निर्माण व्हावेत. चंद्रासारखे शीतल पण कलंकरहित आणि सूर्यासारखे तेजस्वी पण दाहरहित असे आप्तगण, नातलग सर्व सुखांनी पूर्ण होऊन त्यांचे चित्र त्या आदिपुरुषाच्या ठिकाणी निरंतर असावे. या मृत्यूलोकात ग्रंथ हेच ज्यांचे जीवन आहे अशा ज्ञानी लोकांना इहलोकीच्या व परलोकीच्या भोगांवर विजय मिळावा. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की, हा दानप्रसाद होईल. या अलौकिक अशा वरामुळे ज्ञानदेव सुखी झाले. ज्ञानेश्वरांचे हे पसायदान अजरामर आहे. जगाच्या वाङ्मयात याला तोड सापडणार नाही. मानवी मनाची उंची केवढी असू शकते हे या पसायदानावरून ध्यानात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा